मुंबई- कोल्हापूर आणि सांगली भागात पुराचे पाणी ओसरत असले तरी अजूनही शेकडो लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे विशाखापट्टणम येथून नौदलाचे अतिरिक्त पथक कोल्हापूरला दाखल होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दुपारपर्यंत ही पथके दाखल होतील असे मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे जवानासह महसूल, जलसंपदा, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह इतर सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी अहोरात्र पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे विभागीय कार्यालयाने विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. शनिवार, रविवार आणि सोमवारी ही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत राहणार आहेत.