महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूरला गरज 120 एमएलडी पाण्याची मात्र, गळतीमुळे होतोय अतिरिक्त उपसा - कोल्हापूर पाणी उपसा न्यूज

पंचगंगा नदीमुळे कोल्हापूरला मुबलक प्रमाणात पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, जलवाहिन्यांमधून होणाऱ्या पाणी गळतीमुळे अतिरिक्त पाणी उपसा होत आहे. हे असेच सुरू राहिले तर, भविष्यात नक्कीच पाणी संकट ओढाऊ शकते.

Water Supply
पाणी पुरवठा

By

Published : Dec 19, 2020, 7:19 AM IST

कोल्हापूर - शहराला दररोज जितक्या पाण्याची आवश्यकता आहे, त्यापेक्षा जास्त पाणी उपसा होत असल्याचे समोर आले आहे. जलवाहिन्यांच्या होणाऱ्या गळतीमुळे अतिरिक्त पाणी वाया जात आहे. शहरात मोजक्याच ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा सुरू आहे. मात्र, शहरातील प्रत्येक भागात दररोज 3 ते 5 तास पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेचे उपआयुक्त निखिल मोरे यांनी सांगितले. शहरातील जुन्या जलवाहिन्यांच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. लवकरच या जलवाहिन्यांचे काम पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठ्याबाबत माहिती देताना निखिल मोरे

कोल्हापूर शहराला सद्यस्थितीत पाण्याची गरज -

कोल्हापूर शहराला दररोज जवळपास 110 एमएलडी इतक्या पाण्याची गरज आहे. शिवाय शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या भागांनासुद्धा महापालिकेकडून पाणीपुरवठा होत आहे. त्यासाठी जवळपास 10 एमएलडी इतका पाणी पुरवठा केला जातो. अशी दररोज 120 ते 130 एमएलडी पाण्याची गरज दररोज असते.

दररोज 160 एमएलडी पाणी उपसा -

शहराला आणि परिसरात 120 ते 130 एमएलडी इतक्या पाण्याची दररोज गरज असते. येथील पंचगंगा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात पाणी गळती वाढली आहे. जुनी पाईपलाईन असल्याने अनेक ठिकाणी गळती सापडत नाही तर काही ठिकाणी जमिनीमध्येच पाणी मुरत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दिवसाला 160 एमएलडी इतक्या पाण्याचा उपसा करावा लागत आहे. त्यातील 40 एमएलडी पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचेही उपआयुक्त निखिल मोरे यांनी म्हटले आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे ते पूर्ण झाल्यानंतर या समस्या कमी होतील, असेही ते म्हणाले.

शहरात सर्व ठिकाणी होतो पाणी पुरवठा -

कोल्हापूरात शहरातील प्रत्येक भागात महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा केला जात आहे. काही ठिकाणी 3 तास तर काही ठिकाणी 5 तास पाणीपुरवठा केला जातो. काही वेळा पाणी पुरवठा करणार त्या भागातील लाईट गेल्यास अडचणी येतात. मात्र, सर्वांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे असे उपआयुक्त निखिल मोरे यांनी सांगितले.

शहरातील झोपडपट्टी भागात सुद्धा नियमीत पाणीपुरवठा -

शहरातील सर्व झोपडपट्टी भागात सुद्धा दररोज 3 तास पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात जवळपास 65 झोपडपट्ट्या आहेत. मात्र, या भागात काहीजण पाणी चोरी सुद्धा मोठ्या प्रमाणात करत असतात. त्यामुळे याचा हिशोब वाया जात असलेल्या 40 एमएलडी पाण्यामध्येच केला जात आहे. अशांवर काहीवेळा कारवाई झाली आहे. मात्र, आता महापालिकेने सुद्धा वारंवार या भागात पाणी चोरीच्या घटनांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे काही स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.

काही वेळा टँकरद्वारे पाणी पुरवठा -

शहरातील प्रत्येक भागात सुरळीत पाणी पुरवठा केला जातो. मात्र, काहीवेळा तांत्रिक बिघाड आणि लाईट जाण्याच्या घटनानांमुळे एखाद्या भागात पाणी पुरवठा कमी वेळ होतो. त्यावेळी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेच्या एकूण 20 टँकरद्वारे त्या-त्या भागात पाणी पुरवठा केला जातो.

थेट पाईपलाईनकडे शहरवासीयांच्या नजरा -

2044 ची कोल्हापूर शहराची लोकसंख्या विचारात घेऊन शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे जवळपास 70 ते 80 टक्के इतके काम पूर्ण झाल्याचा महानगरपालिकेचा दावा आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाणी पुरवठा सुरू झाल्यास शहरातील सर्वच भागात 24 तास पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details