कोल्हापूर - देशभरात मागील 45 दिवसांपासून कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळा देश जसा काहीसा थांबला आहे. काहीजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. तर, काहींना काहीच काम नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना महिला मात्र, आम्हाला कुठला आलाय लॉकडाऊन ? असा प्रश्न करत आहेत. याचे कारणही तसेच आहे. या महिलांना त्यांच्या घरात रोजची कामे तर करावीच लागत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन असल्याने फारसा काही फरक पडत नसल्याचे महिला सांगतात. मात्र, कोल्हापूर येथील केतकी जाधव या गृहिणीने मात्र वेगळेच मत व्यक्त केले आहे. घरातील कामे तर आपण करतोच. मात्र, आपल्या जीवनसाथीची साथ आपल्याला दररोज दिवसभरासाठी प्राप्त होणे, हे खुप आनंददायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केतकी जाधव आणि सुरज जाधव हे दोघेही आपल्या दोन वर्षांच्या मुलासह घरी असल्याचा आनंद घेत आहे... हेही वाचा...ईटीव्ही भारत विशेष: लाॅकडाऊनमुळे लोहाराचा 'घन' थांबला... पाणी पिऊन काढताहेत रात्र
पतीही देखील करतात मदत...
कोल्हापूर येथील जाधव फॅमिलीमध्ये इतरत्र जसे घडते, त्यापेक्षा थोडं वेगळे वातावरण आहे. घरातील प्रत्येक कामात पती आपल्या पत्नीला मदत करत आहे. त्यामुळे केतकी जाधव यांना महिलांना कुठला आला लॉकडाऊन ? असे म्हणायची वेळ आली नाही. किंबहुना त्यांना हा लॉकडाऊनचा काळ खुप सुखावतो आहे.
कोल्हापुरातील साने गुरुजी वसाहत परिसरातील केतकी जाधव यांचा तीन वर्षांपूर्वी सुरज जाधव यांच्याशी विवाह झाला. नेहमीच व्यस्त असणार्या आपल्या पतीकडून आपल्याला सध्या घरातील प्रत्येक कामात मदत मिळत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा एक सकारात्मक फायदा झाल्याचे केतकी जाधव या सांगत आहेत.
व्यवसाय सध्या बंद असल्याने सूरज जाधव घरी असून पत्नी आणि मुलाला वेळ देत आहे...
केतकी जाधव यांचेपती सुरज जाधव यांचा गुजरी येथे सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. सकाळी दहा वाजता दुकानात गेल्यानंतर ते रात्रीच घरी परत येत असत. अशा व्यस्त वेळापत्रकामुळे नेहमीच कुटुंबाला वेळ देणे त्यांना शक्य होत नसायचे. याबाबत त्यांचे कुटुंबीय त्यांना तक्रारही करायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे सुरज यांना गेल्या 45 दिवसांपासून आपले दुकान बंद ठेवावे लागले आहे. परिणामी हा सर्व वेळ ते आपल्या पत्नीला आणि लहान मुलाला देत आहेत. 'लॉकडाऊन मी खुपच एन्जॉय केला आहे. दररोज बायको आणि मुलाला वेळ देत आहे. किंबहुना मुलासोबत खेळत असताना दिवस कमी पडत आहे' असे सुरज जाधव यांनी सांगितले. तसेच आपल्याला स्वयंपाक करण्याची, वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड होती. पत्नीला स्वयंपाकगृहात मदत करताना आपण ही आवड जोपासत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मुलाला आणि मला 'ते' वेळ देत असल्याने लॉकडाऊनचा काळ सुखावतो आहे...
केतकी आणि सुरज या दोघांनाही आधिश नावाचा एक लहान मुलगा आहे. त्याला दररोजच बाहेर फिरायला घेऊन जावे लागत असे. लॉकडाऊनमुळे आता ते शक्य होत नाही. मात्र, सुरज हे घरी असल्याने ते मुलाला पुर्ण वेळ देत आहेत. 'मुलाला आणि मला त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवता येतो आहे. तसेच ते स्वयंपाकघरातही मला ते मदत करत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा हा काळ आम्हाला सुखावतो आहे' असे केतकी जाधव यांनी म्हटले.