कोल्हापूर - कर्नाटक राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेकडो प्रवाशांना आता बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले आहे. सीमा प्रश्नावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असून पुढील आदेश मिळेपर्यंत बससेवा बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले आहेत.
हेही वाचा -महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळला, शिवसेनेने जाळला मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचा प्रतिकात्मक पुतळा
पण, या दरम्यान महत्त्वाच्या कामानिमित्ताने कर्नाटकात जायचे असलेल्या प्रवाशांनी मात्र या दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कोणी कोणतेही आंदोलन करावे, सर्वांना अधिकार आहे, पण अशा प्रकारे वाहतूक बंद करत महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे एका वयोवृद्ध प्रवाशाने म्हटले आहे.
पुन्हा वाद कुठून सुरू झाला?
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमा वाद गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. याबाबत न्यायालयाचा निकाल सुद्धा यायचा आहे. त्यातच कर्नाटकातील कर्नाटक नवनिर्माण सेने(कनसे)च्या भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला, अशा पद्धतीचे वक्तव्य करून या वादाला आणखीनच फोडणी दिली. या वक्तव्याचा निषेध करत कोल्हापुरातील शिवसैनिकांनी आक्रमक होत भीमाशंकर पाटील यांच्या पुतळ्याचे दहन केले.
हेही वाचा -...तर महाराष्ट्रातील कानडी लोकांचे कपडे काढून हाकलू
कोल्हापुरातील जेष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यासह अनेकांनी भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर भीमाशंकर पाटील यांच्या समर्थकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केल्यानंतर मात्र हा वाद आणखीनच चिघळला आहे. याघटनेनंतर कोल्हापुरातील शिवसैनिक खूपच आक्रमक झाले असून आज कोल्हापुरात या सर्वाच्या निषेधार्थ बस स्थानकापासून निषेध रॅली काढण्यात आली. शिवाय यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या पुतळ्याचे कर्नाटकच्याच नागरिकांच्या हस्ते दहन करण्यात आले. कोल्हापुरातील एका चित्रपटगृहात सुरू असलेला एक कन्नड चित्रपटसुद्धा शिवसैनिकांनी बंद पाडला. दरम्यान, हा वाद आता अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.