कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी आज पहाटेच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा छापा टाकला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ईडी आणि भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्रीय आणि कोल्हापूर पोलीस दलाचा मोठा फोर्स फाटा येथे तैनात करण्यात आलेला आहे. असे असले तरी कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची देखील होत आहे.
तिसऱ्यांदा ईडीची धाड :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसनमुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीची धाड पडली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान आता विविध स्तरातून याबाबतच्या प्रतिक्रिया येत असून हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी नसल्याचे समजत आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध करण्यात येत असून हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते कागल येथील निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर एकत्रित जमले असून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि तपास करण्यात कोणतीही बाधा येऊ नये यामुळे केंद्रीय पोलीस फोर्स आणि कोल्हापूर पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात करण्यात आलेला आहे. तर आक्रमक झालेले कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये देखील जोरदार बाचाबाची होत असून आम्हाला गोळ्या घाला मात्र साहेबाना विनाकारण यात अडकवलं जात आहे असे येथील कार्यकर्ते म्हणत आहेत.