कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणच्या गर्दी पाठोपाठ अत्यंसस्कारासाठी होणारी गर्दीही टाळावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त वीस लोकांनी उपस्थित राहावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये अत्यंसस्कार, रक्षाविसर्जन, दफनविधी आदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही गर्दी टाळणेही महत्त्वाचे आहे. गेल्या आठवडाभरात शहरात दोन ठिकाणी मृतदेहावर अत्यंसंस्कार करून आल्यानंतर संबंधित मृत व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेल्या नागरिकांना संसर्गाची शक्यता निर्माण झाली आहे.