पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बर्खास्त, जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक पदी नियुक्ती - Devasthan Samiti
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अखेर बर्खास्त करण्यात आली आहे. देवस्थान समिती बर्खास्त करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. समिती बर्खास्त केल्यानंतर आता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अखेर बर्खास्त करण्यात आली आहे. देवस्थान समिती बर्खास्त करण्याचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. समिती बर्खास्त केल्यानंतर आता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून देवस्थान समिती बर्खास्तीची चर्चा सुरु होती. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) महेश जाधव देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष होते.
विधी आणि न्याय विभागाने काढला अध्यादेश
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर सध्या भाजपचे महेश जाधव हे अध्यक्ष आहेत. तर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पत्नी वृषाली क्षीरसागर यांची कोषागार म्हणून नियुक्ती आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील सर्वच देवस्थान समिती बर्खास्त करण्याच्या हालचाली सुरू होत्या. अखेर आज (गुरुवार) राज्य सरकारने अध्यादेश काढत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केली आहे. वर्षभरापासून देवस्थान समिती बर्खास्त करण्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे देवस्थान समितीवर कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली होती. मात्र राज्य सरकारने आज अध्यादेश काढत सध्या देवस्थान समितीवर प्रशासक म्हणून कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यांची नियुक्ती केली आहे. राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने हा अध्यादेश काढला आहे. या अध्यादेशामुळे महेश जाधव यांच्यासह सहा जणांचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 42 मंदिरे ही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येतात. या मंदिरातील महसूल आणि नियंत्रणाची जबाबदारी देवस्थान समितीवर होती. 2010 ते 2017 या कार्यकाळात देवस्थान समितीकडे अध्यक्ष पद नव्हते. मात्र युती सरकारच्या काळात भाजपचे महेश जाधव यांना या देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्यासह शिवाजी जाधव, वृषाली क्षीरसागर, राजेंद्र जाधव, राजाराम गरुड व चारुदत्त देसाई यांची नियुक्त करण्यात आली होती..