कोल्हापूर : जिल्ह्यात 2019 आणि 2021 साली आलेल्या महापुराचा विचार करून यंदाही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. शासन-प्रशासन, स्वयंसेवी-सेवाभावी संस्था आणि कोल्हापूरकरांच्या धैर्य आणि संयमी वृत्तीमुळे महापुरातूनही कोल्हापूरकर सावरले. पण महापुरामुळे जिल्ह्याची फार मोठी हानी झाली. त्यामुळे गेल्या दोन मोठ्या महापुराच्या अनुभवावरून आणि यंदाच्या पावसाळ्यात संभाव्य महापुराची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने आतापासूनच नियोजन केले आहे. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 80 बोट : जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज केली आहे. महापुराचा सामना करताना कोणतीही कमी राहू नये यासाठी प्रशासनाने सामग्री अद्ययावत केली आहे. पूर बाधित गावात पूरनियंत्रणाच्या उपाययोजनांचे सुक्ष्म नियोजन केले आहे. महापुराचा अनुभव लक्षात घेऊन पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात बोटिंची व्यवस्था करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 80 बोट असून राज्यातील सर्वाधिक सक्षम आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कोल्हापुरात आहे. संभाव्य पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी, आवश्यक साधन सामुग्रीसुद्धा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी माहिती दिली.
महापुरामुळे बाधित होणारे गावे : महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 386 गावे बाधीत होतात. त्यामध्ये कोल्हापूर शहरासह शिरोळ तालुक्यातील 42, हातकणंगले 23, करवीर 57, कागल 41, राधानगरी 22, गगनबावडा 19, पन्हाळा-47, शाहूवाडी 25, गडहिंग्लज 27, चंदगड 30, आजरा 30, भुदरगड तालुकयातील 23 यांचा समावेश आहे.