कोल्हापूर :आज हुतात्मा दिनानिमित्ताने बेळगाव शहरात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने आमंत्रित केले आहे. मात्र कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा खासदार धैर्यशील माने यांना आज बेळगाव जिल्हाबंदी केलेली आहे. धैर्यशील माने बेळगावच्या हद्दीत दाखल होऊ नये यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
बंदी म्हणजे संपूर्ण भारत देशासाठी खंत : खासदार धैर्यशील माने यांना बंदी आदेश प्राप्त झाल्यानंतर ते म्हणाले, हुतात्मा दिनानिमित्ताने बेळगाव शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आहे. तिथे कोणत्याही पद्धतीने प्रक्षोभक भाषण होणार नाहीत. काल रात्रीपर्यंत प्रशासनाने रितसर परवानगी घेऊन कार्यक्रम घ्या असे म्हटले होते. मात्र रात्री अचानक हा बंदीचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला आहे. या देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास काहीही अडचण आहे का ? तशी बंदी कुणी घालू शकतो का? ही केवळ दडपशाही आहे. विशेष म्हणजे ही केवळ हुकूमशाही आहे. जी गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकात तिथल्या मराठी भाषिकांवर होत आहे. याची खंत वाटत असल्याचेही खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे.