कोल्हापूर - हातकणंगले मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी थेट राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत असे कधीही पाहायला मिळाले नाही. पण ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच घरी जाऊन थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याच्या एका वेगळ्या परंपरेचा पायंडा या लोकसभा मतदारसंघात पडला आहे.
धैर्यशील मानेंनी राजू शेट्टींच्या घरी दिली भेट, शेट्टींच्या आईचे घेतले आशीर्वाद - Hathkanangale constituency
खासदार धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.
गेल्या अनेक महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम आपण सर्वांनी अनुभवला. या दरम्यान नेत्यांमध्ये झालेले अनेक वाद-विवाद, टीका प्रतिटीका आणि टोकाची ईर्ष्या सुद्धा सर्वांना पाहायला मिळाली. निवडणुका झाल्या, निकाल लागले पण ज्या मतदारसंघावर राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते त्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ज्यांच्या विरोधात शेट्टींना पराभव पत्करावा लागला त्या धैर्यशील मानेंनी आज चक्क राजू शेट्टींच्या घरी जाऊन त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले आहेत.
धैर्यशील माने सुद्धा माझ्या नातवासारखे आहेत. जसे काम माझ्या मुलाने केले तसेच काम आणि त्याहूनही अधिक चांगले काम तुम्ही करा, असा आशीर्वाद शेट्टींच्या आईंनी मानेंना दिला. यावेळी शेट्टींनी मानेंनी लोकसभेमध्ये चांगले प्रश्न मांडावेत. माझ्या घरी आल्यामुळे मला खूप आनंद झाला. जनतेने दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे वक्तव्य केले.