कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने त्याची झीज होत आहे. तर मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. देवीच्या मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा यामध्ये बदल झाल्याचे आढळून आले. दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये, असे सांगितले जाते. मात्र कित्येक वर्षांपासून अंबाबाईच्या मूर्तीला अभिषेक न घालताच पूजा केली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन हे पहा दिले जात आहे.
मूर्तीत झाले 'हे' बदल: गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागाकडून मूर्तीला वज्रलेख आणि रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान देवीच्या ओठांना झालेली दुखापत लपविण्याठी तातडीने 18 आणि 19 सप्टेंबर रोजी एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया केली. पण त्यानंतर देवीचा चेहऱ्याावरील पूर्ण भावच बदलले. त्यानंतर 26 जानेवारीला देवीच्या डाव्या कानाजवळील कपचा निघाला. त्यामुळे श्रीपूजकांनी ही बाब 27 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टाने या संदर्भात 14 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु शासन, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणतीही समाधानकारक प्रतिक्रिया उमटली नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मूर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. देवीच्या पानपात्राच्या हाताची दोन बोटे पूर्णपणे झिजली आहेत. तर म्हाळंग घेतलेल्या उजवा हाताच्या बोटांचीही पूर्ण झीज झाली आहे. पावलांवरील बोटे पूर्णपणे निघून गेली आहेत आणि देवीचे वाहन असणाऱ्या सिंहाच्या पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनासी झाली आहे. सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. देवीच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट दिसत आहेत. यामुळे आता सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.