कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ( KDCC Bank Election 2022 ) काल इर्षेने 98 टक्के इतके मतदान ( KDCC Bank Voting ) झाले. उद्या शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार ( KDCC Bank Vote Counting ) आहे. येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे ही मतमोजणी होणार असून, त्याची सर्व तयारी झाली आहे. एकूण 15 जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, उद्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. विशेष म्हणजे प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणुकीत धक्कादायक निकाल ( KDCC Bank Election Result ) लागतील अशी शक्यता आहे.
इतके झाले मतदान
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी एकूण 7 हजार 651 इतके मतदान होते. त्यापैकी 98 टक्के म्हणजेच 7 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 21 जागांपैकी 6 जागा बिनविरोध झाल्या असून, 15 जागांसाठी ही निवडणूक लागली होती. एकूण 33 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे आता मतदार कोणाला कौल देणार आहे, हे उद्याच समजणार आहे. दरम्यान, काल मतदान झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांनी सुद्धा मतदानाचा आढावा घेऊन आकडेमोड करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार अनेकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.