कोल्हापूर -शहरातील बॅंकांसमोर गर्दी होत असल्याने, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट रस्त्यावर उतरत, दसरा चौकातील एका बॅंक अधिकाऱ्याला धारेवर धरले. नियमाचे पालन होत नसेल तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
राज्यात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू झाली आहे. या संचारबंदीत केवळ अत्यावश्यक अस्थापनाच सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र नागरिक बँक, किराणा सामान खरेदी, मेडिकलचे कारण सांगून विनाकारण बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यासोबत शहरातील बँकाबाहेर देखील नागरिक मोठी गर्दी करत आहेत. काही बॅंका या ब्रेक द चेन नियमांचे पालन करताना दिसत नाही. बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे चित्र आहे. यावर महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संताप व्यक्त केला आहे.