कोल्हापूर: हौसेला मोल नाही, असे म्हणतात. कोल्हापुरातनवदांपत्यांच्या हस्ते देवालयांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. देवा, अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन सुखी सहजीवनाची सुरुवात तर अनेक जण करतात. मात्र लग्न लक्षात राहण्यासाठी कुलदैवत असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबा मंदिरावर हेलिकॉप्टरमधून आपल्या सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या, कोल्हापुरातील नवदांपत्यांच्या लग्नाची चर्चा सध्या कोल्हापुरात जोरात सुरू आहे.
विवाह सोहळा पार पडला: वस्त्रनगरी इचलकरंजीतील गोसावी समाजाचे नेते डॉ. आप्पासाहेब माळी हे अजातशत्रू व्यक्तीमत्व, त्याच्या स्वभावाने त्यांनी अनेक माणसे जोडली. गेल्या महिन्या पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या मुलाचा विवाह गोव्यातील मुलीशी ठरला होता, तर गोव्यातील एका मुलाचा विवाह इचलकरंजीतील मुलीशी ठरला होता. यासाठी खास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही उपस्थिती लावली होती. हा विवाह सोहळा हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथे आज पार पडला. गोसावी यांच्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने तो धूमधडाक्यात साजरा करण्याचे त्यांनी ठरविले होते.
हेलिकॉप्टरमधून केली पुष्पवृष्टी: लग्न लक्षात राहावे आणि जोरात व्हावे यासाठी, लग्नाच्या आधी शशिकांत - प्रियांका आणि नवनाथ - संजना या वधूवरांचे हेलिकॉप्टर मधून मंगल कार्यालयात आगमन करण्याचे ठरवले. तर सूर्या एव्हिएशनचे अमर सूर्यवंशी यांनी तसे सांगितले. मात्र अमर सुर्यवंशी यांनी असे करण्याऐवजी महालक्ष्मी, जोतीबा देवावर पुष्पवृष्टी करावी असे सुचवले. ते सर्वांना आवडले त्यानुसार प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. दुपारच्या मुहूर्तावर दोन्ही जोडप्यांचे लग्न पार पडले. यांनतर तीन वाजता दोन्ही वधू वर हे अमर सूर्यवंशी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये दुपारी ३ वाजता बसले आणि अंबाबाई मंदिराकडे रवाना झाले. वातावरण खराब असल्याने त्यांनी पाऊण तासातच प्रथम अंबाबाई मंदिर व नंतर जोतीबा देवावर पुष्पवृष्टी केली. तसेच दोन्ही देवांकडे सहजीवनाचा प्रवास सुखकर व्हावा अशी मनोभावे प्रार्थना केली.