महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना काळात साहित्य खरेदीमध्ये 35 कोटींचा भ्रष्टाचार; जि.प. सदस्य निंबाळकरांचा आरोप - कोल्हापूर भ्रष्टाचार बातमी

कोरोना काळात जिल्हा परिषदेमध्ये 88 कोटींहून अधिक औषध आणि साहित्य खरेदी करण्यात आले. यामध्ये जवळपास 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हापरिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केला आहे.

निंबाळकर
निंबाळकर

By

Published : Mar 2, 2021, 9:58 PM IST

Updated : Mar 2, 2021, 10:49 PM IST

कोल्हापूर - कोरोना काळात जिल्हा परिषदेमध्ये 88 कोटींहून अधिक औषध आणि साहित्य खरेदी करण्यात आले. यामध्ये जवळपास 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हापरिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केला आहे. अनेक वस्तू दुप्पट किंमतीने खरेदी केल्याचेही त्यांनी म्हटले असून जोपर्यंत याची चौकशी होऊन लुटलेल्या पैशांची वसुली होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोलताना निंबाळकर

अनेक वस्तू चढ्या किंमतीने विकत घेतल्या

पत्रकार परिषदेत राजवर्धन निंबाळकर म्हणाले, जिल्हा परिषदेने कोरोना काळात 88 कोटींची खरेदी केली. त्याची सर्व बिलेही अदा करण्यात आली आहे. शिवाय 45 कोटींची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या वस्तू खरेदी केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने पीपीई किट, बेड, थर्मल स्कॅनर, मास्क आदी साहित्यांचा समावेश आहे. बाजारात 400 रुपयांपर्यंत मिळणारे पीपीई किट 1100 ते 1200 रुपयांना खरेदी केले आहेत. 8 ते 9 हजार रुपयांचे बेड 12 हजारांनी खरेदी केले आहेत. तसेच मास्क सुद्धा जवळपास 200 रुपयांपर्यंत खरेदी केले असल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

निंबाळकर यांनी उपस्थित केलेले काही सवाल

राजवर्धन निंबाळकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत कोरोना साहित्य खरेदी घोटाळा संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले. त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांच्याकडून साहित्य खरेदी केले ते पुरवठादार जीएसटी कायद्याखाली रजिस्टर आहेत का ?, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे का ?, त्यांनी संबंधित विक्रीवरील जीएसटी रक्कम शासनाकडे भरणा केली आहे का ?, शिवाय कोणाच्या सांगण्यावरून ही काम देण्यात आली होती ?, पुरवठादार हा कायमस्वरूपी आरोग्य क्षेत्रातील पुरवठादार आहे का ?, असे प्रश्न उपस्थित करत एखादी टेक्सटाईल कंपनी आरोग्य विभागाचे साहित्य कसे पुरवू शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

शेवटपर्यंत लढा देणार

कोरोना काळातील साहित्य खरेदीमध्ये झालेला घोटाळा जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत लढा देत राहणार. कोणत्याही पद्धतीने राजकीय दबावाला बळी न पडता यामधून सत्य बाहेर निघेपर्यंत गप्प बसणार नाही, असा इशाराही निंबाळकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून दिला. शिवाय वेळ पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचीही आपली तयारी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

हेही वाचा -सरकारी व्हेंटिलेटरवर खासगी रुग्णालयांकडून लाखोंची लूट, संभाजी ब्रिगेडचा आरोप

Last Updated : Mar 2, 2021, 10:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details