कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे घाईला आलेल्या गोरगरीब जनतेला वाली कोणीच नाही. अशातच कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा अनेकांना प्रश्न पडला आहे. असाच एक बाप आपल्या नव्या लेकराच्या पोटासाठी स्मशानभूमीत रोजंदारीवर कामाला गेला आणि 21 दिवसांतच त्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ही मन हेलवणारी कहाणी आहे कोल्हापुरातील दिपक थोरावत (वय 29) या तरुणाची. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा आघात बसला आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. 3 ते 4 महिने हा लॉकडाऊन राहिल्याने अनेकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली. सिद्धार्थनगरमध्ये राहणारा दीपक हा केटरिंगच्या कामाला जाऊन आपल्या झोपडीवजा घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मात्र, लॉकडाउनमुळे कार्यक्रम बंद राहिल्याने रोजगार बंद झाला. अशा विदारक परिस्थीतीत त्याच्या घरात पाळणा हलला. मुलं पदरी पडलं मात्र, त्यासह जबाबदारीदेखील वाढली. हातात काम नाही, खायला अन्न नाही अशा परिस्थितीत नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने दीपकच्या चिंतेत आणखी भर पडली. अखेर त्याने नाईलाजाने पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम स्वीकारले. मात्र, अवघ्या पंधरा दिवसात त्याला स्मशानभूमीत कोरोनाची बाधा झाली आणि दोन दिवसांपूर्वी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबाला मोठा आघात बसला. काही दिवसांपूर्वीच या जगात आलेलं बाळ पोरकं झालं. आपला जन्मदाता बाप आता आपल्याला कधीच आंगा खांद्यावर खेळवू शकणार नाही. कोरोनाने त्याला हिरावून घेतले, याची साधी कल्पनाही आईच्या कुशीत निपचित पडलेल्या त्या चिमुकल्याला नसेल.