महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन - वाघवे कोरोना न्यूज

कोल्हापूर शहरात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. पण ग्रामीण भागात काळजी घेतली जात आहे. वाघवे गावात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या गावात कोरोना 2021 या नव्या सालात केवळ 6 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

kolhapur
kolhapur

By

Published : May 7, 2021, 7:48 PM IST

Updated : May 7, 2021, 9:48 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती खूपच गंभीर होत चालली आहे. असे असतानाही शहरामध्ये नागरिक नियमांचे पालन करताना पाहायला मिळत नाहीत. सकाळी 11 वाजेपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. या तुलनेत ग्रामीण भागात मात्र थोडसं वेगळं वातावरण आहे. नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकच काळजी घेताना दिसत आहेत. पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातसुद्धा ग्रामपंचायतीने कोरोनाला गावापासून लांबच ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत.

वाघवे गावात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन

सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील वाघवे या गावात सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. गावातील सर्वच नागरिकांकडून ग्रामपंचायत प्रशासनाला चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळत आहे. सर्वात पहिला गावातील आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. मेडिकल, तसेच दवाखाने वगळता सर्वच दुकानं सकाळी 11 वाजेनंतर पूर्णपणे बंद केली जातात. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आजपर्यंत सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. कोरोना दक्षता समितीचीसुद्धा स्थापना करण्यात आली असून त्यांच्याकडून गावात कोणी नियमांचे उल्लंघन करत नाही ना याची पाहणी केली जात आहे.

गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

इतर जिल्ह्यातून गावात आलेल्या नागरिकांची नोंदणी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावात दुसऱ्या जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येकाची माहिती ठेवली जात आहे. शिवाय त्यांना कोणत्याही पद्धतीने कोरोनाची लक्षणे असल्यास त्यांना चाचणी करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे गावात आजपर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही. गावातील नागरिकांनी यापुढेही अशाच पद्धतीने सहकार्य करावे, असे सरपंच प्रदीप पाटील यांनी आवाहन केले आहे.

औषध फवारणी करण्यात येणार

कोरोनाला हरविण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत. लवकरच संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात येणार आहे. गावात चुकून कोणी रुग्ण आढळला तर त्या रुग्णाच्या घरासह शेजारचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जात आहे. तसा फलकसुद्धा लावण्यात येत असल्याची माहिती गावचे सरपंच प्रदीप पाटील यांनी दिली.

वाघवे गावातील लसीकरण

वाघवे गावामध्ये ग्रुप ग्रामपंचायत आहे. यामध्ये गुडे या छोट्याशा गावाचा समावेश आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीने 45 वर्षांवरील जवळपास 60 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. एकूण लाभार्थी 1 हजार 677 इतके होते. त्यातील 1 हजार 09 नागरिकांनी लस घेतली आहे. तर 18 ते 45 वर्षांवरील 2 हजार 212 लाभार्थ्यांपैकी अद्याप एकाचेही लसीकरण झाले नाही. आत्तापर्यंत 3 वेळा गावामध्ये लसीकरण कॅम्प अयोजित करण्यात आला होता. याद्वारे नागरिकांनी लसीकरण करून घेतले. उर्वरित नागरिकांचेसुद्धा लस उपलब्ध होताच लसीकरण करून घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या लाटेत गावात केवळ 'इतके' रुग्ण

गत वर्षीसुद्धा वाघवे गावात चांगल्या पद्धतीने उपाययोजना राबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला नव्हता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही म्हणजेच 2021 या नव्या सालात गावामध्ये केवळ 6 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. दुर्दैवाने त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र, सद्यस्थितीत गावात एकही कोरोना रुग्ण नसून सर्व खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा -हेल्प रायडर्समुळे मिळाली त्याला अखेर मृत्यूच्या वाटेतून सुटका ..

हेही वाचा -मराठा आरक्षण : गरज पडल्यास एक दिवसीय अधिवेशन घेऊ - अजित पवार

Last Updated : May 7, 2021, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details