कोल्हापूर - कोरोना विषाणूमुळे राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेता शनिवारपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडास्पर्धा आदींवर 31 मार्चपर्यंत बंदीचे आदेश दिले आहेत. मात्र, नागाव येथील एका संस्थेचा कार्यक्रम मात्र मोठ्या उत्साहात पार पडला.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला आमदार विनय कोरे, माजी आमदार सुजित मिणचेकरसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा आदेश पायदळी तुडवला गेल्याची चर्चा परिसरात सुरू होती. जिल्हाधिकारी देसाई यांनी जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या आदेशाचे पालन झाले नसल्याचे दिसून आले आहे.