कोल्हापूर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढच होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दुसरीकडे एक दिलासा देणारा व्हिडिओ 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागला आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भजन म्हणत स्वतःला चिंतामुक्त करताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये अनेक वृद्ध नागरिक आहेत. या सर्व वृद्ध नागरिकांना तणावातून मुक्त करत आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी गांधीनगरच्या एका व्यापाऱ्याने भजन कीर्तनामध्ये त्यांना व्यस्त ठेवले आहे.
सर्वजण आपापल्या खाटांशेजारी उभे राहून मंदिरात ज्यापद्धतीने भजन करतात अगदी त्याच पद्धतीने रुग्णालयात टाळ्या वाजवत भजन करत आहेत. हरींचे नामस्मरण करत आहेत. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव सुद्धा त्यामुळे दूर झाल्याचे दिसून येत आहे. गांधीनगरमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. ज्या वॉर्डमध्ये त्यांना दाखल केले आहे तिथे अनेक वृद्ध रुग्ण आहेत, तर काही रुग्ण तरुण असल्याने ते मोबाईलवर वेळ घालवतात. कुटुंबीयांशी बोलत असतात. मात्र, वृद्ध लोकांकडे असे काहीच पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे ते व्यापारी कीर्तनाच्या माध्यमातून या वृद्धांचे मनोबल वाढवत आहेत. आजार बरा होणारा आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, असेही ते सर्वांना सांगत आहेत.