कोल्हापूर - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलत आले असून, खोटं बोलूनच सत्ता मिळवल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे शोषण होणारे कायदे पास केले आहेत. मात्र, आता त्यांना शेतकऱ्यांच्या अक्रोशाला सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या सरकारने नुकतेच 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. नागरिकांना वाटले काहीतरी मदत मिळेल, मात्र अजून 1 पैसा सुद्धा कोणाला मिळाला नाहीय. त्यामुळे त्यांनीच आता 20 लाख कोटी कुठे आहेत हे सांगावे? असे आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिले आहे.
केंद्रसरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्या विरोधात काँग्रेसने गुरुवारी कोल्हापुरातील निर्माण चौक ते ऐतिहासिक दसरा चौकपर्यंत भव्य ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आयोजित सभेमध्ये पाटील बोलत होते. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी सुद्धा रॅलीमध्ये सहभागी झाले होते. शिवाय मोठ्या शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने आपले ट्रॅक्टर घेऊन रॅलीमध्ये उपस्थिती लावली होती.
चव्हाण पुढे म्हणाले, आता नरेंद्र मोदींची वक्रदृष्टी शेतकऱ्यांकडे वळली आहे. सरकारी कंपन्या, घरातील सोनं विकायची वेळ यांनी नागरिकांवर आणली आहे. एकूणच केंद्र सरकारच्या कृषी विरोधी कायद्याच्या विरोधातील कायदे आपण महाराष्ट्रातील विधान परिषद आणि विधानसभेत पास करता येतील त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. शिवाय पुढचा टप्पा तालुकास्तरावर व्हर्च्युअल रॅली घेऊन लोकांपर्यंत हे कायदे कसे चुकीच्या पद्धतीने लादले जात आहेत ते पटवून देऊ असेही त्यांनी म्हंटले.
कामगारांचे कायदे केंद्राने संपवले -बाळासाहेब थोरात
काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, की केंद्र सरकारने कृषी कायद्यांबरोबरच कामगारांच्या हक्काच्या कायद्यांना सुद्धा हात लावून ते संपवून टाकले आहेत. कामगाराचा विचार न करता केवळ मोठ मोठ्या मालकांचा विचार करून त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वांसमोर आता या सरकारचे खरे रूप समोर येत असून शेतकरी आणि कामगारवर्गच या सरकारला धडा शिकवेल असेही थोरात यांनी म्हंटले.
'यातील' कोणतीही एक जागा काँग्रेसला द्या; निवडून आणायची जबाबदारी माझी - सतेज पाटील
पदवीधर किंव्हा शिक्षक मतदारसंघातील कोणतीही एक जागा काँग्रेसला द्या निवडून आणायची जबाबदारी माझी असेल असा विश्वास यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. नुकतीच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी काँग्रेसला उमेदवारी द्या. तशा पद्धतीने जोरदार तयारी झाली असून मोठ्या प्रमाणात नोंदणी सुद्धा झाली आहे. त्यामुळे एक जागा काँग्रेसला द्या निवडून आणायची जबाबदारी आपली राहील असा विश्वास सतेज पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.