कोल्हापूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्या कुटुंबाबाबत चिंता करू नये. माझ्यावर माझ्या आईचे संस्कार झालेत आणि माझी आई कोल्हापूरची होती, असा घणाघाती टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे. कोल्हापूरमध्ये आज दोन्ही काँग्रेस आणि मित्र पक्षांचा मेळावा पार पडला. यात ते बोलत होते.
कोल्हापुरात महाआघाडीच्या मेळाव्याचे आयोजन मोदींनी वर्ध्यामध्ये भाषण करताना पवार कुटुंबीयांवर टीका केली होती. त्यावर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, अजित पवार उत्तम काम करतात. ते उत्तम प्रशासक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुण्या एकाचा नसून जनतेचा पक्ष आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवत मोदी कुठे गेले तर गांधी परिवारावर टीका करतात. मात्र, इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवून इतिहासच नाही, तर भूगोल घडवला असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच राजीव गांधींची हत्या झाल्यानंतरही सोनियांनी देश सोडला नाही. असे म्हणत त्यांनी यावेळी सोनिया गांधी यांची स्तुती केली. तर दुसरीकडे यावेळी शिवारात कमळ दिसता कामा नये. चंद्रकांत पाटील यांनी बिंदू चौकात चर्चेला यावेच, असे आव्हान दिले. आमच्या नादाला लागू नका, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. तसेच लोक तुम्हाला उघडे पाडतील असेही ते म्हणाले.
हसन मुश्रीफ यांनीही चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका करत, ज्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही. ते एकही निवडणूक न हरलेल्या शरद पवारांवर टिका करतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.