कोल्हापूर- पहाटे सकाळी चार वाजता उठून लस घेण्यासाठी रांगेत उभे राहायचे, १० वाजेपर्यंत उन्हात चटके सहन करायचे आणि लस संपली असल्याचे ऐकताच घरी जायचे. असा क्रम आयसोलेशन लस केंद्रावरील आहे. लसीचा तुटवडा असल्याने नागरिकांनी आज या केंद्रावर संताप व्यक्त केला. ज्यांना नोंदणी करण्याचे माहिती आहे, ते लस घेऊन जातात. मात्र, आमच्यासारख्या अडाणी लोकांना काय? समजणार अशी भावना ज्येष्ठ नागरिक व महिलांची आहे.
कोल्हापूर जिल्हा कोरोना प्रतिबंधक लसीकरणात राज्यात आघाडीवर आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 8 लाख 13 हजार 153 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवार या दोन दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने बऱ्याच केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला होता. तसेच काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग देखील घडले होते. दरम्यान, आज सोमवारी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडे 70 हजार नवीन मात्रा उपलब्ध झाल्याने सोमवार पासून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला होता. सोमवारी एकाच दिवशी तब्बल 50 हजार नागरिकांना लस देण्यात आली. मंगळवारपासून केवळ नोंदणी असणाऱ्या लोकांना लसीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्याने बऱ्याच नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ घातला. सकाळी पाच वाजल्यापासून रांगेत थांबून देखील लस मिळत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.