कोल्हापूर- मनाविरुद्ध घटस्फोट मागणाऱ्या सासू, सासरा, नवरा आणि आई-वडिलांच्या विरोधात मुलीने अक्षरशः टाहो फोडला. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा मागे घेण्यासाठी तीन लाख रुपये घे, पण घटस्फोट दे! म्हणणाऱ्या नातेवाईकांचा डाव मुलीने उधळून लावला आहे. ही घटना कोल्हापुरातील कसबा-बावडा रस्तावर घडली. दरम्यान, या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित मुलगी ही अंबरनाथ येथील आहे. तिचा राजेंद्रनगर येथील मुलाशी विवाह झाला होता. मात्र, सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याने या मुलीने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. आज त्याची सुनावणी होती. मात्र, मुलीने तक्रार मागे घेऊन घटस्फोट द्यावा, त्यासाठी तीन लाख रुपयांची बोली लावली असल्याचे मुलीने सांगितले. हे प्रकरण मिटवण्यासाठी राजपूत समाजाच्या प्रतिनिधींनीदेखील मध्यस्ती केल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या मुलीने तीन लाख रुपये घेऊन तक्रार मागे घ्यावी आणि घटस्फोट द्यावा, अशी इच्छा तिच्या आई आणि नातेवाईकांची होती. त्यासाठी ते तिच्यावर दबाव टाकत आहेत, असा आरोप या मुलीने केला आहे.
तीन लाख रुपये घे, पण घटस्फोट दे! असा दबाव
विशेष विवाह कायद्याद्वारे (कोर्ट मॅरेज) आम्ही लग्न केले आहे. मात्र, काही काळानंतर सासरच्या लोकांनी मला छळण्यास सुरुवात केली. मुलाने आणि त्याच्या वडिलांनी माझ्यासोबत वाईट केले. त्याविरोधात मी तक्रार दाखल केली आहे. मात्र, आता घटस्फोट मागत आहेत. माझी इच्छा नसताना देखील तीन लाख रुपये घे, पण घटस्फोट दे! असा दबाव टाकत असल्याचा आरोप मुलीने केला. तक्रार मागे घेतल्यास समाजात माझे अस्तित्व काय राहिले? असा सवाल मुलीने आईला केला. धक्कादायक बाब म्हणजे याचे समर्थन मुलीच्या आईने केले आहे. मुलीचे चांगले करायचे आहे, म्हणून घटस्फोट घेत आहोत, असे तिच्या आईचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांना ताब्यात घेत शाहुपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती.
जात पंचायत बसल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल?
दरम्यान, या प्रकरणाचा न्याय-निवाडा करण्यासाठी राजपूत समाजाचे प्रतिनिधी या आवारात आले होते. याच परिसरात त्यांनी जात पंचयात घेत प्रकरणाचा न्याय निवाडा केला असल्याचे समजते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले.