परीक्षा शुल्कावर स्पर्धा परीक्षार्थींचा सवाल कोल्हापूर :भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिंदे-फडणवीस सरकार विविध शासकीय विभागांमध्ये नोकर भरती करत आहे. राज्याच्या विविध शासकीय विभागांमध्ये 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. गेल्या 2-3 वर्षात कोरोनामुळे राज्यातील नोकर भरती थांबली होती. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. आता होणाऱ्या भरतीमुळे राज्यातील सुशिक्षित तरुणांना दिलासा मिळाला आहे.
फीमध्ये सवलत द्या :राज्य सरकारमधील आरोग्य सार्वजनिक, बांधकाम, ग्रामविकास, महसूल आणि वन, जलसंपदा, आदिवासी वैद्यकीय शिक्षण या विभागांमधील पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांसाठी उमेदवार अर्ज करत असतात. परंतु प्रत्येक विभागातील पदाच्या भरतीसाठी 1 हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहेत. यामुळे उमेदवारांना 8 ते 10 हजार रुपये परीक्षा शुल्क भरावे लागत आहे. एकीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी परीक्षार्थींना घरापासून लांब राहावे लागते. शहराच्या ठिकाणी राहण्याचा खर्च जमा करताना विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत होत असते. अर्ज करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या फीमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत.
कलेक्टर होण्यासाठी 100 रुपये खर्च येतो, मग तलाठी होण्यासाठी हजार रुपये फी का? असा आमचा सवाल आहे. या पैशातून निवडणुकीचा खर्च सरकारला गोळा करायचा आहे का - परीक्षार्थी
अडीच लाख जागा रिक्त : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त असल्याने याचा परिणाम प्रशासकीय कामावर होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने पद भरतीचा निर्णय घेतला, मात्र अर्ज करण्यासाठी वाढीव शुल्कामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, मात्र भरती प्रक्रियेसाठी होत असलेल्या विलंबामुळे 15 ऑगस्टची डेडलाईन हुकणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा -
- 'मराठा समाजाला वगळून तलाठी भरती केली तर आंदोलन'
- MPSC Exam Result 2023 : चप्पल-जोडे शिवणाऱ्यांची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक; शिकवणी न लावता एमपीएससी उत्तीर्ण
- Transgender Success Story: तृतीयपंथीय म्हणून मिळणाऱ्या टोमण्यांना सेजलने दिले उत्तर, बारावीत मिळविले प्रेरणादायी यश