कोल्हापूर- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून देशभरात लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. अनेकांच्या हातचे काम गेल्याने कामगारांनी गावाकडचा रस्ता पकडला आहे. सध्या लाॅकडाऊमध्ये शिथीलता देऊन उद्योगांना सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, सध्या कामगारांचा तुटवडा जाणवत आहे. यावर उद्योजकांनी रोबोटिक्स यंत्रावर भर देण्याचा उपाय केला आहे. कोल्हापुरात सध्या चार ते पाच टक्के उद्योजकांकडे रोबोटिक्स तंत्र वापरले जात आहे. त्याबाबत 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा.
कोरोनानंतरच्या काळात कामासाठी रोबोटिक्स यंत्रावर भर... 90 हजारांहून अधिक परप्रांतीय गेले घरी...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील 90 हजारांहून अधिक परप्रांतीय मजूर त्यांच्यामूळ गावी गेले आहेत. ते परत येतील की नाही? याबाबत अद्याप काहीच सांगता येत नाही. अनेकांनी पुन्हा येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, ते येतीलच याची खात्री नाही. परिणामी लॉकडाऊननंतर पुन्हा उद्योगांना गती पकडण्यासाठी जिल्ह्यातील उद्योगनगरीत रोबोटिक्स यंत्राचा वापर केला जाणार आहे.
कंपनीत आता रोबो काम करणार....
जपान मधील सर्वाधिक वेगवान रेल्वेला ज्या कंपनीचे ब्रेक्स आहेत, त्या कंपनीकडून 10-12 रोबोटिक्स आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या दोन रोबोटिक्स यंत्राद्वारे काम सुरू आहे. या रोबोटिक्स यंत्रामुळे प्रत्येक काम हे परफेक्ट होते. दहा व्यक्तींचे काम एक रोबोटिक्स यंत्र करते. त्यामुळे कामात गती आहे. वेल्डींग, फिटिंग, पार्ट सुटे करणे यासह अनेक कामे या रोबोटिक्सद्वारे केली जात आहेत. हेच तंत्र आता आखणी वाढवून कामगारांचा तुटवडा भरुन काढण्याचे नियोजन सुरू झाले असल्याची माहिती, उद्योजक दिनेश बुधले यांनी दिली.
वेल्डींगसाठी रोबोटिक्सचा वापर...
जपान, युरोप, अमेरिका येथे या पद्धतीचे यंत्र मोठ्या प्रमाणात वापरले जातात. ज्या ठिकाणी कामगारांचा तुटवडा जाणवतो त्या ठिकाणी रोबोटिक्सचा वापर झाल्याचे जगभरात दिसून येते. आपल्याही कंपनीत वेल्डींगसाठी रोबोटिक्सचा वापर केला जात आहे. रोबोटिक्सचे काम परफेक्ट असते. मनुष्य विरहीत काम होऊ शकते. भविष्यात कामगारांच्या तुटवड्यावर रोबोटिक्सचा वापर वाढवावा लागणार आहे.
15 लाखांपासून ते 20 कोटींपर्यंतचे रोबोट...
दहा किलोपासून ते 15 टनापर्यंतचे रोबोटिक्स सध्या तयार आहेत. त्यांची किंमत 15 लाखांपासून 20 कोटींपर्यंत आहे. जिल्ह्यातील काही उद्योजकांनी याचा वापर गेली काही वर्षे सुरू केला आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या कामगार तुटवड्याच्या काळात हेच यंत्र पर्याय ठरत असल्याचे राहुल बुधले यांनी सांगितले.