कोल्हापूर CM Eknath Shinde Kolhapur Tour :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन (Karveer Nivasini Ambabai) घेतलं. राज्यातील सरकार शेतकऱ्यांचं आहे. साखर कारखान्यांच्या नफ्यातील वाटणीनुसार शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजेत. ऊस दर आंदोलनात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं आहे. शेतकऱ्याचं हित हेच सरकारचं धोरण आहे. ऊस दर आंदोलनात बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलं. कोल्हापुरात अंबाबाई दर्शनानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.
शेतकरी हित पाहणारं सरकार : राज्य सरकारने केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदे बाजूला ठेवून राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केलं आहे. नैसर्गिक संकटातही राज्यातील शेतकऱ्याला सरकारने मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्याला सरकारने एक रुपयात पिक विमा देऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी हित पाहणारं हे सरकार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यासाठी राज्यभरात कुणबी नोंदी एकत्र करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करणार असल्याचं, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.