महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर जिल्ह्यातील 37 शाळांमधील दहावीचे वर्ग सुरू; सोमवारपर्यंत ९४० शाळा होणार सुरू - kolhapur school reopen news

कोल्हापुरातील काही गावांमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी असल्याने 37 शाळांमधील दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तसेच सोमवारपर्यंत जिल्ह्यातील ८ वी ते 12 पर्यंतच्या 940 शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे.

school
शाळा संग्रहित फोटो

By

Published : Jul 6, 2021, 3:27 PM IST

Updated : Jul 6, 2021, 5:25 PM IST

कोल्हापूर - राज्यात कोरोना ओसरल्याने महाराष्ट्र ऑनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शाळेची घंटा पुन्हा वाजण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोल्हापुरातील काही गावांमध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी असल्याने 37 शाळांमधील दहावीचे वर्ग सुरू झाले आहेत. तसेच सोमवारपर्यंत जिल्ह्यातील ८ वी ते 12 पर्यंतच्या 940 शाळा सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, पालकांची सहमती असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना कोणतीच सक्ती करण्यात येणार नाही.

माहिती देताना माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार

राज्यातील कोरोना लाटेचा कहर आता बऱ्यापैकी ओसरला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. बंद असलेले शाळेचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. राज्यातील कोरोनामुक्त भागांमध्ये पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, शासनाच्या परिपत्रकानुसार कोणत्या भागात शाळा सुरू करण्यात येणार आहेत, याची माहिती जिल्हा प्रशासनाने ज्या त्या शाळांना दिली आहे.

जिल्ह्यातील २०० शाळा सुरू होण्याचे नियोजन पूर्ण -

कोरोनामुळे बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 37 शाळांमधील दहावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. मात्र, शासनाच्या परिपत्रकानुसार पुन्हा एकदा जिल्ह्यातील शाळा सुरू होण्यासाठी सज्ज आहेत. जवळपास 940 शाळांनी वर्ग सुरू करण्याबाबत सहमती दर्शवली आहे. त्यानुसार आज जवळपास दोनशे शाळा सुरू झाल्याचे नियोजन केले आहे.

माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांची धडपड -

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे अध्यापन, अध्ययन कसं करायचं? असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू व्हावी, अशी अनेक पालकांची इच्छा आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी हे शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, ग्रामपंचायत, शाळा प्रशासन यांना कडक सूचना देत या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी नियम पाळत शाळा प्रशासनाला सहकार्य करावे, यासाठी स्वतः माध्यमिक शिक्षणाधिकारी शाळांना भेट देऊन पाहणी करणार आहेत.

सोमवारपर्यंत १०२५ पैकी ९४० शाळा सुरू करण्याचा मानस -

शासनाचे परिपत्रक आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी संपर्क साधला. ऑनलाईन बैठक घेऊन चर्चा विनिमय करण्यात आली. या चर्चेमध्ये 940 शाळांनी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याची सहमती दर्शवली. पालकांना विश्वासात घेऊन त्यांनी परवानगी दिली तरच शाळा सुरू करण्यात येतील, असं शाळा प्रशासनाचे मत आहे. मात्र या सर्व गोष्टींना विचारात घेऊन सोमवारपर्यंत 940 शाळा सुरू करण्याचा मानस माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केला. दरम्यान, योग्य खबरदारी घेऊन ५ वी ते 7 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कागलच्या चौंडेश्वरी विद्यालयात फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत -

फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील हळदी येथील चौंडेश्वरी हायस्कूलमधील दहावीचे वर्ग दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. या गावात कोरोनाचा प्रभाव कमी आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान लक्षात घेता ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. तसेच कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे भारावून गेलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांची उधळण करत केले.त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजल्यामुळे शिक्षक देखील भारावून गेले आहेत.

जिल्ह्यातील ३७ शाळांमधील १० वीचे वर्ग सुरू -

कोल्हापूर जिल्ह्यातील 64 गावांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी आहे. तसेच अनेक गावात कोरोनाने शिरकाव केलेला नाही. अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच्या परवानगीने तसेच जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने 37 शाळांमधील दहावीचे वर्ग यापूर्वीच सुरू केले आहेत. तसेच सर्व विद्यार्थ्यांना कोरोनाबाबतचे नियम व मार्गदर्शन केले असून योग्य ती खबरदारी घेऊनच वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

शालेय विभागाचे आदेश -

राज्यातील कोरोनामुक्त भागात शाळा सुरू करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. या भागातील आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशाप्रकारे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. दरम्यान, या शाळा सुरू झाल्यावर शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बेंचवर केवळ एक विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बॅच मध्ये सहा फुटाचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोरोना विषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे. तसेच त्यांना सतत हात धुवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांची पन्नास टक्के उपस्थिती असणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत घेण्याची सक्ती केली जाणार नाही. पालकांच्या परवानगी घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा -विधानसभा-मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून राणेंची केंद्रात लागणार वर्णी, मध्यप्रदेशात भाजपला गादीवर बसवणारे ज्योतिरादित्य होणार केंद्रीय मंत्री

Last Updated : Jul 6, 2021, 5:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details