कोल्हापूर :शहरातील एका खासगी शाळेतदहावीच्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेवर 'जय श्रीराम' लिहिले होते. त्यानंतर शाळेतील एका शिक्षिकेने या विद्यार्थ्याला खडसावले होते. याबाबतची माहिती समजताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते शाळेबाहेर जमले. याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारण्यात आला. प्रशासनाने संबंधित शिक्षकेला निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदूत्ववादी संघटना शांत झाल्या. या प्रकारामुळे शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यामुळे काही काळ तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.
'अशी' घडली घटना :कोल्हापूर शहरातील शिवाजी पार्क परिसरात असणाऱ्या एका खासगी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या उत्तर पत्रिकेवर सुरुवातीला 'जय श्रीराम' लिहिले होते. याला शाळेतील एका शिक्षिकेने विरोध करत जाब विचारला. संबंधित विद्यार्थ्याला या शिक्षिकेने खडसावले होते. याबाबतची माहिती हिंदुत्ववादी संघटनांना मिळताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते या शाळेत दाखल झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित शिक्षकेवर निलंबनाची कारवाई करावी. तसेच कोणत्याही जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना कोणतेही धार्मिक बंधन लावू नये, अशी मागणी केली होती.
परिसरात तणावाचे वातावरण :या प्रकारामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. तातडीने शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार सिंदकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी शाळा प्रशासन, शिक्षिका, विद्यार्थी आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यासोबत बैठक घेऊन माहिती घेतली. दरम्यान हिंदुत्ववादी संघटना शिक्षिकेचे निलंबन करावे, या मागणीवर ठाम राहिल्या. अखेर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करत असल्याचे सांगितले, त्यानंतर हा तणाव निवळला.
महिन्याभरातील तिसरा प्रकार :कोल्हापूरमध्ये 'जय श्रीराम'वरुन वाद होण्याचा हा महिन्यातील तिसरा प्रकार आहे. यापूर्वी कोल्हापुरातील अभियांत्रिकी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय आणि आता या खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. शहरामध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याने याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. यामुळे समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.