कोल्हापूर-राष्ट्रीय स्मारक असलेल्या पन्हाळगडावरील डेरेमहाल (रेडे महाल) सुस्थितीत असला तरी केंद्रीय पुरातत्व विभाग तो पडण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल इतिहास प्रेमीतुन व्यक्त होत आहे. सध्या ही इमारत आतून उंदीर, घुशीनी पोकरली असून त्याची परिस्थिती अत्यंत विदारक आहे. कोणत्याही प्रकारची स्वछता, देखभाल या ठिकाणी केली जात नाही. गडावरील ही एकमेव अशी वास्तू आहे जीचा आजपर्यंत वापर होत आला आहे. मात्र, ही वास्तू केंद्रीय पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे अखेरच्या घटका मोजत आहे. ईटीव्ही भारतच्या स्पेशल रिपोर्ट मधून पाहुयात नेमकी काय परिस्थिती आहे या महालाची
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला म्हणजे पन्हाळागड होय. कोकण व घाटमाथ्यावर सरहद्दीवर असणाऱ्या पन्हाळगडाला इतिहासात अधिक महत्त्व आहे. रायगड, राजगडानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सर्वाधिक वास्तव्य पन्हाळगडावर झाले. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची राजधानी होती. शिवकाळापूर्वी म्हणजेच (सन १२०० च्या काळात) प्रथम शिलाहार राजा भोज नरसिंह याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधण्याची नोंद आढळते. शिलाहार राजा भोज याची पन्हाळा किल्ला हा राजधानी होती. शिलाहारांचा देवगिरीच्या यादवांकडून पराभव झाल्यावर हा किल्ला यादवांच्या ताब्यात गेला. बिदरच्या बहामनी सेनापती महमूद गवान यांनी पावसाळ्याच्या कालावधीत १४६९ मध्ये या गडावर हल्ला केल्याची एक नोंद आढळते. या आक्रमणानंतर सन १४८९ मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या आधिपत्याखाली गेला. त्यानंतर अफझलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची इतिहासातील भेट याच किल्ल्यावर झाली होती. पुढे छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली करवीरची राजधानी म्हणून या गडाची ओळख झाली. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात पन्हाळा किल्ल्याला सर्वाधिक महत्त्व आहे. चार दरवाजे, तीन दरवाजे सज्जाकोठी, धान्य कोठार, धर्माकोठी, नायकिणीचा सज्जा, सोमेश्वर तलाव, डेरेमहाल, महाराणी ताराराणी यांचा वाडा, अशा अनेक वास्तू या गडावर आहेत. गडकऱ्यांच्या उठावानंतर इंग्रजांनी या गडावरील चार दरवाजा जमीनदोस्त केला आहे.
डेरे महाल (रेडे महाल) -
सध्याच्या पन्हाळा गडावरील पोलीस चौकी समोर एक इमारत आपल्याला निदर्शनास येते. भव्य आणि आडवी इमारत निदर्शनास येते. त्यास रेडे महाल असे म्हणतात. वास्तवात ती एक पागा आहे. मात्र, छत्रपती ताराराणी साहेबांच्या कारकिर्दीत तेथे जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणतात. मात्र, या महालाची रचना व त्यातील कमानी व कोरीव काम पाहता हा रेडे महाल नसून डेरे महाल असावा, असे इतिहासकारांचे मत आहे. अतिथींच्या निवासासाठी याची योजना असावी, असे वाटते. सध्या तेथे जनता बाजार आहे.
डेरे महालाचा झाला रेडे महाल -
गडावर येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत या महालात केले जायचे. त्याची चौकशी करून पुढे छत्रपती महाराजांची भेट करवून दिली जायची. त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था या महालात केली जायची. म्हणून त्याला डेरे महाल म्हंटले जायचे. पण छत्रपती ताराराणी यांच्या काळात या महालाची ओळख रेडे महाल अशी करण्यात झाली. कोकणातून धान्यांची ने-आण करण्यासाठी त्यावेळी रेड्यांचा मोठा वापर केला जात असे. सध्याचे कोल्हापूर ते पन्हाळा या रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा जी झाडे आहेत, त्या झाडांना पाणी घालण्याचे काम या रेड्यांच्या करवी केले जायचे. त्यानंतर या रेड्यांना याच महालात बांधले जायचे. या शीवाय कैद्यांना या महालात ठेवले जायचे. म्हणून त्याची ओळख कालांतराने रेडे महाल अशी झाली, असे इतिहासकारांचे मत आहे.