कोल्हापूर - आजही कोल्हापुरातील अनेकांना नर्सरी बाग येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक मंदिराबाबत माहिती नाही आहे. स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या परिसरात शिवरायांचे मंदिर बांधले होते. दरवर्षी मोठ्या उत्साहात याठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते. अगदी छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत याठिकाणी शिवजयंती सोहळा पार पडत असतो. नेमकं कुठे आहे मंदिर? आणि काय आहे यामागे इतिहास पाहुयात, ईटीव्ही भारतच्या या विशेष रिपोर्टमधून...
1917 साली निर्मिती -
कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरच्या अगदी शेजारील सोन्या मारुती मंदिर चौकासमोरून जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला गेल्या अनेक वर्षांपासून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बनवलेली नर्सरी बाग आहे. विशेष म्हणजे या बागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुंदर कोरीव दगडांमध्ये दुमजली मंदिर सुद्धा त्यांनी बनवले. याच बागेच्या परिसरात तारा राणींचे आणि संभाजी महाराजांचेही मंदिर आहे. शिवाय राजघराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या समाधी आहेत. जवळपास 100 वर्षांपूर्वी बनवलेली ही सुंदर मंदिरं आजही सुस्थितीत आहेत. मात्र काही वर्षांपासून या नर्सरी बागेकडे दुर्लक्ष झाले होते. नुकतेच या ठिकाणी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सुंदर समाधी स्मारक बनले आहे. शिवाय परिसरात लॉन लावण्यात आला असून नर्सरी बागेच्या या परिसराला पुन्हा एकदा झळाळी प्राप्त झाली असून बागेचे रुपडे पालटले आहे. याच परिसरात राजर्षी शाहू महाराजांनी बनवलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात दरवर्षी शिवजयंती थाटात साजरी होती.