कोल्हापूर - मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडणार आहोत. यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना राष्ट्रपतीपर्यंत पोहोचवसाठी छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले (उद्या 2 सप्टेंबर)रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत संभाजीराजे राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता भेटीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
चारही पक्षातील प्रतिनिधींना आमंत्रण
मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींकडे मांडण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या सोबत राज्यातील प्रमुख चार पक्षांच्या प्रतिनिधींनाही सोबत येण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी असणार आहेत.