कोल्हापूर - २०१४ पेक्षा यावेळी आम्हाला कमी यश मिळाले आहे. ज्या ठिकाणी आमचा पराभव झाला तेथे आम्ही आत्मचिंतन करु, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. जागा जरी कमी झाल्या तरी सरकार हे महायुतीचेच येणार असल्याचे ते म्हणाले. बंडखोरांचा पक्षाला अनेक ठिकाणी फटका बसला आहे. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार असणारे ऋतुराज पाटील यांना उघड पाठिंबा दिला. ही प्रवृत्ती चुकीची असल्याचे पाटील म्हणाले. कोल्हापूरकरांनी आमचं काय चुकलं ते सांगावे असेही पाटील म्हणाले.
कोल्हापूरमध्ये ऐवढी कामे करुनही लोकांनी आम्हाला डावलले आहे. याचे आम्ही आत्मचिंतन करु, मात्र, आमचे काय चुकले हे आम्हाला जनतेने सांगावे असेही पाटील म्हणाले. आम्ही बंडखोरांना रोखण्यात अपयशी ठरलो, त्याचा पक्षाला तोटा झाल्याचे पाटील म्हणाले. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते.
सरकार महायुतीचेच येणार - चंद्रकांत पाटील काँग्रेसला बळ देणारा निर्णय उद्धव ठाकरे घेणार नाहीत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेसला बळ देणारा निर्णय घेणार नाहीत. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे पाटील म्हणाले. मी जरी कोथरुड मतदारसंघातून निवडून आलो असलो तरी कोल्हापूरकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे पाटील म्हणाले.
उदयनराजेंचा पराभव जिव्हारी
छत्रपती उदयनराजेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे. त्या पराभवाचे आम्ही आत्मचिंतन करु, असेही पाटील म्हणाले. उदयनराजेंचा आदर, मान सन्मान ठेवला जाईल, आमच्या मनात त्यांच्याबद्दल कायम आदर असल्याचे पाटील म्हणाले.
२० अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा
भाजपच्या १०५ जागा आल्या आहेत. त्यामध्ये २० जण जोडले गेले आहेत. आम्हाला २० अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला असल्याचे पाटील म्हणाले. युतीत बंडखोरी झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाल्याचे पाटील म्हणाले.