कोल्हापूर : गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे. 'चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस आणण्यासाठी सहकार्य करावे', असे सतेज पाटलांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
अर्धवट टाळेबंदीने कोरोनाही जाणार नाही आणि सर्वसामान्यांचे दुःखही कमी होणार नाही, असे चंद्रकांत पाटलांनी म्हटले. यावर सतेज पाटलांनी प्रत्युत्तर दिले.
'एका बाजूला मुख्यमंत्री जनतेचा जीव कशाप्रकारे वाचेल या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप त्यावर टीका करत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन केंद्रात जायला हवे आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त कोरोना लसीचे डोस मिळतील, यासाठी प्रयत्न त्यांनी करायला हवा. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात किती डोस मिळाले? याचा अभ्यास चंद्रकांत पाटलांनी केला पाहिजे. भाजपा राज्य सरकारच्या कामकाजावर चिखलफेक आणि राजकारण करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी दिल्लीला जाऊन आज जेवढी कोरोना लस महाराष्ट्राला मिळत आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट लस महाराष्ट्राला आणण्याचं काम त्यांनी करावं', असे सतेज पाटील म्हणाले.