कोल्हापूर - आंबेओहोळ प्रकल्पाचे काम गेली दहा वर्ष रखडले होते. मी मंत्री असताना हा प्रकल्प मंजूर केला. मात्र, आज याचे कोणीतरी श्रेय घेत असल्याचे मी पाहिले. जे श्रेय घेत आहेत, तेच लोक घळ भरणीच्या वेळी न्यायालयात गेले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
हेही वाचा -कोल्हापुरात मुसळधार; राधानगरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले
तुम्ही दहा वर्षे आमदार असताना हा प्रकल्प का रखडला? असा सवालही मुश्रीफ यांनी केला. आज आंबेओहोळ प्रकल्पाच्या पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाचे आज पाणी पूजन कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. मुश्रीफ यांच्या प्रयत्नांमुळेच हा प्रकल्प मार्गी लागला.
प्रकल्पाचा शेतकऱ्यांना फायदा होणार
आंबेओहोळ या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील शेती सुजलाम-सुफलाम बनेल. या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी पुनर्वसनाचे काम करण्यासाठी मुश्रीफ हे प्रयत्न करत आहेत. याचे सर्व श्रेय त्यांना मिळायला हवे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.