कोल्हापूर -'कुणी कुणाला धमकी द्यायची आवश्यकता नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. सुरुवात कोणी केली महत्त्वाचे नाही. याचा शेवट काहीही होऊ शकतो,' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. आम्हीही शिव्या देऊ शकतो, असा इशाराच त्यांनी भाजपच्या नेत्यांना दिला होता. याबाबत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, 'सुरुवात कुणी केली हे महत्वाचं नाही, पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत चाचली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती नीट केली पाहिजे. अन्यथा याचा शेवट काहीही होऊ शकतो'. असा इशारा देखील त्यांनी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणले, 'भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दात टीका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल देखील वाईट शब्द वापरले जातात. राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं?' असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.