महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बहीण-भावंडांनी वहीच्या पानावर बनवला होता घराचा 'प्लॅन'; चंद्रकांत पाटलांनी पूर्ण केले वीर जवानांच्या घराचं स्वप्न - kolhapur breaking news

कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील वीरजवान ऋषिकेश जोंधळे यांनीही आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहिले होते. सुटीवर आल्यावर नवीन घर बांधायला सुरू करू, अशी त्याची इच्छा होती. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानच्या हल्ल्यात ऋषीकेश यांना वीरमरण आले आणि त्याने पाहिलेले स्वप्नही अपूर्णच राहिले. मात्र, ऋषीकेशच्या मृत्यूनंतर त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Aug 29, 2021, 8:45 PM IST

कोल्हापूर - प्रत्येकाचेच आपल्या स्वप्नातले एक घर असते जे एक दिवस पूर्ण व्हावे, अशी प्रत्येकाचीच ईच्छा असते. कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील वीरजवान ऋषिकेश जोंधळे यांनीही आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहिले होते. सुटीवर आल्यावर नवीन घर बांधायला सुरू करू, अशी त्याची इच्छा होती. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानच्या हल्ल्यात ऋषीकेश यांना वीरमरण आले आणि त्याने पाहिलेले स्वप्नही अपूर्णच राहिले. मात्र, ऋषीकेश यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण झाले आहे.

बहीण-भावंडांनी वहीच्या पानावर बनवला होता घराचा 'प्लॅन'; चंद्रकांत पाटलांनी पूर्ण केले वीर जवानांच्या घराचं स्वप्न

गतवर्षी ऐन दिवाळीला ऋषिकेशला पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण

13 नोव्हेंबर, 2020 रोजी जम्मू काश्मीर येथे सीमेवर पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आले होते. 2018 साली कोल्हापूर बीआरओ 6 मराठामध्ये ऋषिकेश भरती झाला होता. त्यानंतर बेळगाव येथे त्यांने 9 महिन्यांचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर पहिलीच नेमणूक त्याची जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती. मात्र, पाकिस्तानच्या हल्ल्यात अवघ्या विसाव्या वर्षी ऋषिकेश यांस वीर मरण आले. सर्वात दुःखद म्हणजे भाऊ बीज दिवशीच 16 नोव्हेंबर, 2020 रोजी ऋषिकेश यांची बहीण कल्याणी जोंधळेवर आपल्या वीर भावाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याची वेळ आली होती. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली होती.

अखेर शहीद जवान ऋषिकेश जोंधळेचे स्वतःच्या घराचे अपूर्ण स्वप्न पूर्ण...

बहीण कल्याणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे ऋषीकेश यांनी जेव्हा जागा विकत घेतली होती. तेव्हापासूनच तिने आणि ऋषीकेश यांनी आपल्या स्वप्नातील घर कसं असावं याचे अनेक प्लॅन वहीच्या पानावरच बनवले होते. अशाच पद्धतीने पुढे जाऊन घर बांधू, असे ऋषीकेश यांचे स्वप्न होते. सुट्टीवरून परत आल्यानंतर घर बांधायला सुरुवात करु, असेही बोलणे झाले होते, असे त्यांची बहीण कल्याणीने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले. त्यामुळे ऋषिकेश आणि कल्याणीने ज्या पद्धतीने घराचे डिझाइन बनवले होते त्याच पद्धतीने घर बांधल्याने आज स्वप्न पूर्ण झाले असल्याचेही तिने म्हंटले आहे.

घर बांधल्यानंतरच लग्न करणार; वडिलांकडे व्यक्त केली होती इच्छा

ऋषिकेश सैन्य दलात भरती होऊन केवळ एक ते दोन वर्षेच झाले होते. मोठ्या कष्टातून आणि परिश्रम घेऊन ऋषिकेश सैन दलात भरती झाले होते. घरच्यांना त्यांनी आपली स्वप्ने बोलूनही दाखवली होती. वडिलांनाही त्याने आपण पहिला घर बांधू त्यानंतरच माझ्या लग्नाचा विचार करू, असे बोलून दाखवले होते. मात्र, त्याचे हे स्वप्न शेवटी स्वप्नच राहिले असल्याचे म्हणत घराचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर तो आमच्या सोबत नसल्याचे दुःखही वडिलांनी व्यक्त केले.

ऋषिकेश यांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याची चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली होती ईच्छा

दिवाळीच्या वेळी देशाच्या रक्षणासाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या सुपुत्राने स्वतःचा जीव गमावला होता. ऋषीकेश यांना परत आणता येणार नाही. मात्र, ऋषिकेश यांची अपूर्ण स्वप्ने तरी पूर्ण करण्याची आपली जबाबदारी आहे, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्याचे स्वप्नातले घर बांधून द्यायची जबाबदारी घेतली होती. त्यानुसार घरासाठी येणारा सर्व खर्च करत ऋषीकेश यांच्या स्वप्नातील घर उभा केले आहे. त्यानुसार ऋषीकेशच्या स्वप्नातील घरामध्ये आज त्यांच्या घरच्यांनी प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, धनंजय महाडिक, हिंदुराव शेळके, राहुल चिकोडे यांच्यासह भाजप पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

भोसरीच्या आमदारांनी दुसरा मजला बांधून देण्याची व्यक्त केली इच्छा

ऋषीकेश यांच्या स्वप्नातले घर पूर्ण झाले असले तरी घराचा वरचा मजला आपण बांधून देणार असल्याची इच्छा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे. सध्या त्याचे सुद्धा काम सुरू आहे. नुकतेच रक्षाबंधन दिवशी आमदार लांडगे यांनी ऋषीकेश यांची बहीण कल्याणीकडून राखी बांधून घेत रक्षाबंधन साजरे केले होते. त्यानंतर त्यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा -...म्हणून सतेज पाटील आणि धनंजय महाडिक एकत्र येत नाही - चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details