कोल्हापूर - पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्यमंत्री संजय राठोड यांच्यावर सोमवारपूर्वी कारवाई करून त्यांचा राजीनामा घ्यावा. अन्यथा तोंड न उघडणाऱ्या या सरकारला विधानभवनामध्ये तोंड उघडू देणार नसल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. शिवाय पूजा चव्हाण प्रकरणावरून सरकारवर निशाणा साधत अनेक प्रश्न उपस्थित केले असून सरकार अजूनही का गप्प आहे असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर ज्यांनी देशाच्या राजकारणात भरीव काम केले आणि नेहमीच अन्यायाच्या विरोधात कडक भूमिका घेणारे शरद पवारसुद्धा पूजा चव्हाण प्रकरणावर काहीच बोलायला तयार नाहीयेत असेही पाटील म्हणाले. कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राठोड प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा - CHANDRAKANT PATIL LATEST NEWS
कोणत्याही चौकशीची भीती दाखवून वाघिणीसारख्या लढत असलेल्या चित्रा वाघ यांना तुम्ही गप्प बसवू शकणार नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. चित्रा वाघ यांच्या पतीने आर्थिक हेराफेरी केली असल्याचा ठपका ठेवत त्यांची चौकशी केली जात असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.
संजय राऊत यांना जे सुचेल ते मांडण्याची सवय
पेट्रोलचे दर वाढत आहेत, हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याबाबत भाजप आंदोलन करत नाही. त्यांनी जर आंदोलन केले तर आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ असे खासदार संजय राऊत म्हणाले होते. संजय राऊत यांना जे सुचेल ते मांडायची सवय आहे. बहुतेक ते वाचत नसावेत किंवा ते त्याकडे कानाडोळा करत असावेत. जागतिक स्थरावर कशापद्धतीने बॅरेलचे दर वाढत चालले आहेत याबाबतचा चार्ट प्रसिद्ध केला आहे. दुसरासुद्धा एक चार्ट प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये महाराष्ट्र सरकार इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कर आकारत आहे. त्यामुळे आम्ही नक्की आंदोलन करू मात्र. महाराष्ट्र सरकार विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल. पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेलसुद्धा जीएसटीमध्ये घेऊ असे म्हंटले आहे. त्यामुळे सर्व राज्यांचे करसुद्धा एक समान होतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.