कोल्हापूर - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक वाद कोल्हापूरकरांसाठी काही नवीन नाही. या दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक वाद पाहायला मिळत आहे. गंमत म्हणजे एकमेकांवर दोघांनीही टीका केली. मात्र मुश्रीफ यांच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील कोल्हापूरात पाहायला मिळाले. तर चंद्रकांत पाटील यांच्या टीकेनंतर हसन मुश्रीफ अहमदनगरचा दौरा करून आले.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातील महापौर तीन तीन महिन्यांचा करतात, असे एका मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्या या टीकेला प्रत्यत्तर देताना 4 दिवसांपूर्वी हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली होती. चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्याने मोठे केले असे असताना ते काहीही वक्तव्ये करत आहेत. शिवाय कोरोनाच्या काळात कोल्हापूरची जनता मेली की जगली, हे सुद्धा पाहायला चंद्रकांत पाटील पुण्यातून कोल्हापूरात आले नाहीत, असेही मुश्रीफ यांनी म्हटले होते.
मुश्रीफ यांच्या टीकेनंतर चंद्रकांत पाटील कोल्हापुरात; पाटलांच्या टीकेनंतर मुश्रीफ अहमदनगरमध्ये
चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ एकमेकांवर टीका करायची संधी कधीच सोडत नाहीत. आताही मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आणि पाटलांनी थेट कोल्हापूर गाठले. तर पाटलांच्या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी अहमदनगर गाठले.
मुश्रीफ यांच्या या टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांनी लगेचच पास काढून पुण्यातून थेट कोल्हापूर गाठले. कोल्हापूरात येताच चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांच्या टीकेला प्रत्युत्तर द्यायची संधी सोडली नाही. मुश्रीफ यांनी मला जो प्रश्न विचारला तोच त्यांच्या नेत्याला विचारायला हवा. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी मातोश्री सोडले नाहीये. शिवाय आपण ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात त्या अहमदनगर जिल्ह्यात आता आपण असायला हवे होता. आपण इथे काय करताय, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला होता. गंमत म्हणजे मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर न देता थेट अहमदनगर गाठले. गुरुवारी दिवसभर त्यांनी अहमदनगरचा धावता दौरा केला आणि ते पुन्हा कोल्हापूरकडे परत यायला निघाले आहेत. एकंदरीतच एकमेकांच्या टीकेमुळे अहमदनगरकरांना त्यांच्या पालकमंत्र्यांची 20 दिवसानंतर भेट झाली आणि कोल्हापूरकरांना चंद्रकांत पाटील यांची तब्बल 2 महिन्यांनी भेट झाली.