कोल्हापूर -राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र, मतदानाआधी राज्यातल्या शेकडो ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील ग्रामपंच्यात निवडणूक बिनविरोध केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहेत. मात्र, कोल्हापूर शहरालगतच असलेल्या तामगाव या गावातील तरुण मुलांनी दोन मोठ्या नेत्यांना टक्कर देत स्वतःचेच पॅनेल काढले आहे. शिवाय गावात जोरदार प्रचार सुद्धा सुरू केला असल्यामुळे याची सर्वत्र चर्चा होत आहे. पण या तरुण मुलांना स्वतःचं पॅनेल काढायची का वेळ आली बघुया 'ईटीव्ही भारत'चा विशेष रिपोर्ट.
कोणते गाव आणि गावाची एकूणच पार्श्वभूमी
कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील 'तामगाव'या गावामध्ये तरुण मुलांनी एकत्र येऊन स्वतःचे पॅनेल काढले आहे. जवळपास 7 ते 8 हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या तामगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री सतेज पाटील आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचे आपापले पॅनेल आहेत. मागच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचे दोन पॅनेल होते. तर महाडिक गटाचे एक पॅनेल होते. मात्र कोणत्याच पॅनेलला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे पहिले अडीच वर्षे पाटील गटाच्या एका गटाने महाडिक गटासोबत हातमिळवणी करून गावात सत्तास्थापन केली होती. मात्र, नंतर काही कारणात्सव पुन्हा सत्ताबदल होऊन दोन्ही पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
पदांची खांडोळी आणि विकासाला खीळ -
तामगावमध्ये ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून 2015 सालापर्यंत एकूण 9 ते 10 सरपंच झाले आहेत. मात्र, 2015 ते 2020 या पाच वर्षात तब्बल 9 वेळा सरपंच बदलले. तर 8 वेळा उपसरपंच बदलण्यात आले. पदांची होत असलेली खांडोळी कुठेतरी थांबली पाहिजे, असे गावातल्या तरुणांना वाटत होते. शिवाय एकालाही पूर्णवेळ सरपंच पदाचा पदभार सांभाळता आला नसल्याने ते आपल्या गावाचा विकास कसा करतील, असा सवाल गावकऱ्यांना पडत होता. त्यामुळे गावातल्या तरुणांनी एकत्र येऊन स्वतःचे एक पॅनेल काढले. 'जनकल्याण आघाडी' असे नाव त्यांनी आपल्या पॅनेलला दिले आहे. गावातील इतर दोन्ही गटांसमोर या पॅनेलने मोठे आव्हान सुद्धा निर्माण केले आहे.
बिनविरोध व्हावी यासाठी तरुणांनी केले प्रयत्न -
गावात विकास व्हावा, तसेच सर्वांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुद्धा तरुणांनी प्रयत्न केला होता. मात्र, कोणीही याकडे गांभीर्याने घेतले नाही. हे समजल्यानंतर सर्वच तरुणांनी मिळून आपल्या पॅनेलची घोषणा केली. त्यानुसार उमेदवार सुद्धा निवडणुकीसाठी उभे केले आहेत.
सर्व उमेदवार सुशिक्षित -