महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jayaprabha Studio In Kolhapur : लता मंगेशकरांच्या 'जयप्रभा'साठी आजपासून साखळी उपोषण - Jayaprabha Studio In Kolhapur

कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या जयप्रभा स्टुडिओची ( Jayaprabha Studio In Kolhapur ) विक्री 2 वर्षापूर्वीच झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे.

'जयप्रभा
Jayaprabha Studio In Kolhapur

By

Published : Feb 13, 2022, 1:53 PM IST

कोल्हापूर -दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये ( Jayaprabha Studio In Kolhapur ) भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि यासाठी चाचपणी सुरू झाली. मात्र, कोल्हापूरची अस्मिता आणि भालजी पेंढारकर यांच्या कार्याची एकमेव आठवण असलेल्या या स्टुडिओची विक्री 2 वर्षापूर्वीच झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता या प्रकरणामुळे कोल्हापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे. काल शनिवारी ही बातमी दिवसभर वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि अनेकाचा रागाचा पारा चढला. दरम्यान अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने आजपासून जयप्रभा स्टुडिओच्या दरात बेमुदत साखळी उपोषण सुरू केलं आहे. जो पर्यंत स्टुडिओची जागा परत मिळत नाही आणि येथे सिनेमाचे शूटिंग सुरू होत नाही. तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचे कलाकारांनी सांगितले आहे. आता या उपोषणास अनेक संघटनांचा पाठिंबा देखील मिळत असून कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक कोल्हापूरकर जयपर्भा स्टुडिओसाठी पुन्हा लढा उभा करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत.

'जयप्रभा'साठी आजपासून साखळी उपोषण

अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाचे उपोषण सुरू -

जयप्रभा स्टुडिओ दोन वर्षाखालील विकली गेली असल्याची घटना काल समोर आली. यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चांगलेच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही जागा विकली जाऊ नये याकरिता अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व कोल्हापुरातील सामाजिक संस्था आणि कोल्हापूरकर यांनी मिळवून लढा उभारला होता. मात्र, कोणालाही न करता गुप्त पद्धतीने ही जागा विकले गेल्याचे काल समोर आल्यानंतर आजपासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने साखळी उपोषणाचा बडगा उगारला आहे. शालिनी स्टुडिओ व जयप्रभा स्टुडिओचे भूमी बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही, म्हणत जोरदार घोषणाबाजी करत आणि हलगीच्या नादात सकाळी दहा वाजल्यापासून उपोषण सुरू झाले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत. तोपर्यंत जयप्रभा स्टुडिओ पुन्हा सुरू होणार नाही आणि हे साखळी उपोषण चालूच ठेवण्याचा निर्धार कलाकारांनी केला आहे. दरम्यान या उपोषणास आता अनेक जणांचा पाठिंबा मिळत आहे.

या आहेत मागण्या -

  • जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे.
  • जयप्रभा स्टुडिओ मधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी व चित्रीकरण या व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यावसायिक वापर होऊ नये.
  • कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यावसायिकीकरण/वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये.
  • जयप्रभा स्टुडिओ याचे जतन होण्याकरिता शासनाने व कोल्हापूर महानगर पालिकेने लक्ष घालावे.

काय आहे जयप्रभा स्टुडिओचा इतिहास -

जयप्रभा स्टुडिओ आणि येथील एकूण 13 एकर जागा भालजी पेंढारकर यांनी विकत घेतली होती. त्यामध्ये अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले. अनेक दिग्गज कलाकार याठिकाणी येऊन गेले. अनेकांच्या करिअरची सुरुवात या जयप्रभा स्टुडिओमधूनच झाली. सर्वकाही ठीक सुरू होते. त्याच काळात महात्मा गांधी यांची हत्या झाली आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशभर पाहायला मिळाले. याच वेळी जयप्रभा स्टुडिओ सुद्धा जाळण्यात आला. यात स्टुडिओचे प्रचंड नुकसान झाले. भालजीनी आपल्या कमाईचे सर्व पैसे जयप्रभा पुन्हा उभा करण्यासाठी लावले. शिवाय अनेक ठिकाणहुन कर्जही काढले. मात्र पुढे त्यांच्या डोक्यावर कर्ज झाल्याने शेवटी हा स्टुडिओ त्यांनी त्यांच्या जवळच्या असणाऱ्या मंगेशकर कुटुंबाला विकायचे ठरवले आणि लता मंगेशकर यांनी त्यांच्याकडून हा स्टुडिओ आणि 13 एकर जागा विकत घेतली. विकताना या ठिकाणी केवळ चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहावे अशी अट त्यांनी घातली होती. त्यानुसार चित्रपट निर्मितीचे काम सुरू राहीले. तेवढ्यात भालजी पेंढारकर यांचे निधन झाले आणि पुढे जयप्रभा स्टुडिओमध्ये चित्रपट निर्मितीचे काम सुद्धा थांबले. पुढे कित्येक वर्षे हा स्टुडिओ बंदच होता.

लता मंगेशकर विरोधात कोल्हापूरकर -

भालजी पेंढारकर यांच्या निधनानंतर लता मंगेशकर यांनी एकूण 13 एकर जागेपैकी साडे नऊ एकर जागा विकासकाला विकली. त्या ठिकाणी सध्या मोठ्या इमारती उभ्या आहेत. मात्र त्यातील उरलेली साडेतीन एकर जागा तशीच होती. पुढे महानगरपालिकेने शहरातील अनेक जागा, वास्तू हेरिटेज वास्तू मध्ये नोंद केल्या. यामध्ये जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा सुद्धा समावेश होता. लता मंगेशकर या निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या. मात्र मंगेशकर यांच्या या भूमिकेनंतर संतापलेल्या कोल्हापूरकरांनी मात्र आंदोलन पुकारले. शिवाय जिथे चित्रपटांचा पाया रचला गेला त्या जागेची पुढे जाऊन विक्रीच होणार यामुळे ही जागा अशीच राहावी, अशी विनंती सुद्धा कोल्हापूरकरांनी केली. यासाठी मोठे आंदोलन उभे राहिले, अनेक वर्षे ते चालले. महापालिकेला पाठिंबा देत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने सुद्धा मोलाचा सहभाग नोंदविला. शेवटी 2017 ला लता मंगेशकर यांनी स्वतः सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली होती. मात्र, त्यानंतर सर्वांनाच अंधारात ठेऊन पुन्हा ही जागा विक्रीची प्रक्रिया सुरू केली आणि 2020 मध्ये ज्यावेळी जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू होता त्याच्या सुरुवातीलाच जागेची विक्री झाल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -उद्योजक राहुल बजाज यांचे पार्थिव आकुर्डी येथील निवासस्थानी आणले

ABOUT THE AUTHOR

...view details