कोल्हापूर - कोल्हापूरकरांनी नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे कोल्हापूर नेहमीच चर्चेत राहिले आहे. आता हेच पहा ना! आपल्या गल्लीत असणाऱा वाघ्या श्वान मेल्यानंतर त्याचे वर्षभराने प्रथम पुण्यस्मरण साजरे केले आहे. तेही चक्क गाव जेवण घालून. यावेळी वाघ्या परत ये.. अशी हाक उत्तरेश्वर पेठ येथे असणाऱ्या मस्कृती तलाव मित्र मंडळाने दिली आहे.
वाघ्या आठवणी ठेऊन गेला.. कोल्हापुरात श्वानचे प्रथम पुण्यस्मरण गाव जेवण घालून साजरे - कुत्र्याची प्रथम पुण्यतिथी
कोल्हापूरची माणसं लय भारी राव.. असं अनेकवेळा म्हणण्यासारख्या घटना शहर व जिल्ह्यात घडत असतात. आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. वाघ्या या श्वानाने पहिले पुण्यस्मरण कोल्हापुरातील मंडळींनी चक्क गाव जेवण घालून साजरे केले आहे.
कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठ येथे असणाऱ्या मस्कृती तलाव मित्र मंडळाच्या गल्लीत असणारा वाघ्या कुत्रा. एक वर्षांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. गल्लीत वाघ्या अशी हाक दिली तर, धावत येणारा हा वाघ्या आज हाकेला धावत येत नाही. त्याची खंत आज देखील या गल्लीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आहे. आज वाघ्याला जाऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्याचा सहवास आजदेखील येथील लोकांना जाणवतो. त्याच्या प्रेमापोटी आज या गल्लीतील नागरिकांनी वाघ्याचे प्रथम पुण्यस्मरण गाव जेवण घालून साजरे केले.
दोन वर्षांपूर्वी गावठी कुत्र्यांनी जखमी केलेल्या अवस्थेत वाघ्या गल्लीतील मुलांच्या नजरेस पडला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावर उपचार करत त्याचा सांभाळ केला. बघता-बघता वाघ्या मोठा झाला आणि मंडळात रमून गेला. मात्र आज वाघ्या नसल्याचे दुःख वाटते, असे गल्लीतील कार्यकर्ते म्हणतात.