कोल्हापूर - दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दूध खरेदीत दरवाढ मिळावी, यासाठी राज्यात दूध आंदोलन पेटले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला पाच रुपये तर, भाजपा व मित्रपक्षांनी दुधाला १० रुपये दरवाढ देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांचा वाली होण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरू आहे. दूध उत्पादक शेतकरी मात्र, यावर काहीसा नाराज आहे. शेतकरी घर चालवण्यासाठी हा व्यवसाय करतो. दूध उत्पादकांना दररोज काय मेहनत घ्यावी लागते? एका गायी पाठीमागे किती रुपये तोटा-नफा होतो? त्यांना किती वेळ द्यावा लागतो? हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या संपूर्ण दूध व्यवसायाच्या अर्थकारणाचा मागोवा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
कोल्हापुरातील सूर्यवंशी कुटुंब गेल्या २० ते २५ वर्षांपासून दूध व्यवसाय करत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते. चार म्हशी व चार गाईंचे पालन ते करतात. आजवर त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच अवलंबून आहे. सकाळी जनावरांचे शेण मागे सारण्यापासून त्यांच्या कामाला सुरुवात होते. दररोज जनावरांना अंघोळ घालणे, त्यांना पाणी पाजणे, चंदी मिश्रण घालणे, वैरण घालून धार काढणे, काढलेले दूध डेअरीला घालणे, ही सर्व कामे आवरायला नऊ वाजतात. त्यानंतर पुन्हा जनावरांना दुपारसाठी लागणाऱ्या वैरणीची तजवीज करावी लागते. स्वत:च्या शेतात वैरण असेल तर ठिक नाही तर त्यांना ती विकत घ्यावी लागते. एकूणच त्यांना या सर्व कामातून रिकामे व्हायला दुपारी १२ ते १ वाजतात. दोन तास विश्रांती घेऊन पुन्हा दुपारी ३ वाजता कामाला सुरुवात करावी लागते. जनावरांना वैरण, पुन्हा चंदीचे मिश्रण घालून धार काढणे, आणि दूध डेअरीला घेऊन जाणे अशी कामे करावी लागतात. या कामातून त्यांना रात्री आठ वाजता विश्रांती मिळते. एकूणच दिवसभरातील १२ तास या जनावरांच्या देखभालीसाठी लागतात. सूर्यवंशी कुटुंबासारखीच परिस्थिती जवळपास सर्व दूध उत्पादकांची आहे.
सूर्यवंशी कुटुंबाला मिळणारे उत्पन्न -
चार म्हशी व चार गाईंपासून मिळणाऱ्या दुधाचा व्यवसाय सूर्यवंशी कुटुंब करते. त्यांना दररोज प्रत्येक जनावराला चार किलो गोळी व दोन किलो भुस्सा खाद्य म्हणून देण्यात येतो, तर साधारण दिवसभरात प्रत्येक जनावराला शंभर रुपयांची वैरण दिली जाते. एक गाय दिवसाला साधारण १२ लिटर दूध देते. गोकुळ दूध संघाच्या नियमानुसार त्यांना दर दहा दिवसाला दुधाचे बिल मिळते. एका गायी मागे दहा दिवसाला त्यांना तीन हजार रुपयेपर्यंत उत्पन्न मिळते. दूध संघाकडूनच भुस्सा, गोळी(खाद्य)दिले जाते. गोळीच्या ५० किलोचे पोते १ हजार ६० रुपये, तर भुस्सा १ हजार ४० रुपये दराने मिळतो. एका गाईला दर दहा दिवसाला गोळी व भुश्श्याचे पोते लागते. मिळालेल्या ३ हजार २०० रुपयांमधून २ हजार ११० रुपये दूध संघ खाद्याची रक्कम वजा करून घेतो आणि उर्वरित १ हजार १०० रुपये सूर्यवंशी कुटुंबाला मिळतात. त्यातूनही दहा दिवसांत वैरणीसाठी ७०० रुपये खर्च होतात. म्हणजे दहा दिवसांचे फक्त ५०० रुपये उत्पन्न एका गाईपाठीमागे सूर्यवंशी कुटुंबाला मिळतात. चार गाईंचे (भाकड जनावरांसह) दहा दिवसांच्या १ हजार २०० रुपये उत्पन्नातून वीज बिल, पाणी बिल, इंधन खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च आणि संपूर्ण उदरनिर्वाह या खर्चातून करावा लागतो, असे शालू सूर्यवंशी सांगतात.
जनावारांच्या भाकड काळात सर्वाधिक तोटा -