कोल्हापूर: कागलचे विवेक कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आमदार हसन मुश्रीफ चाळीस हजार शेतकरी सभासद आहेत असे सांगतात. त्यानुसार प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे होणारे शेअर्स रक्कम 40 कोटी रुपये इतकी होते. कारखाना उभारणीच्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या आवाहनानुसार या कारखान्याचे भाग खरेदी केले आहेत. मात्र हे शेतकरी या कारखान्याचे सभासदच नसल्याची शंका शेतकऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात शेतकरी विवेक कुलकर्णी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका: गुन्हा दाखल होताच मुश्रीफ यांच्याकडून पत्रक काढण्यात आले आहे. त्यात म्हंटले आहे की, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेतकऱ्यांची अफाट जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर उभारलेले श्रम मंदिर आहे. विघ्नसंतुष्ट प्रवृत्ती शेतकऱ्यांच्या श्रम मंदिराला गालबोट लावण्याचे प्रयत्न करत आहेत. राजकीय द्वेषापोटी शेतकऱ्यांचा गळा घोटू नका, अशी समज देणारे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखांनी दिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या षडयंत्रामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची कोणतीही चौकशी व शहानिशा न करता दाखल केलेल्या या गुन्ह्यामुळे याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील, असेही पत्रकात म्हटले आहे. शिवाय आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर मुरगुडात दाखल झालेला गुन्हा हा राजकीय सूटबुद्धीतूनच दाखल केला आहे असे या पत्रकात म्हटले आहे.