कोल्हापूर-इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी 6 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आज (मंगळवार) पहाटे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 50 टक्क्यांहून अधिक भाजल्याने भोरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली आहे.
नरेश भोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
यामध्ये इचलकरंजीचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन अकराचे प्रमुख दीपक पाटील, आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार नगरपालिकेचे माजी सभापती मारुती पाथरवट, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिसाळ, ठेकेदार कर्मचारी अमर लाखे या 6 जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखेर मृतदेह ताब्यात घेताला
नातेवाईकांनी नगरपरिषदेच्या दारातच मृत नरेश भोरे यांचा मृतदेह ठेवत जोपर्यंत कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पालिकेच्या दारातून मृतदेह हलवला.
काय आहे नेमकं प्रकरण?
4 दिवसापूर्वी इचलकरंजी येथील शहापूर रस्त्यावरून मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी घंटागाडीला बांधून रस्त्यावरून फरफटत ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मृत डुक्कर बांधून ओढत नेणाऱ्या घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरून संबंधित गाडी चालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच, त्याच्यावर दहशत निर्माण करून भोरे यांना चक्क मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते.
या घटनेच्या निषेधार्थ भोरे यांनी संबंधितांवर कारवाई व्हावी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, कारवाई झाली नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचीही दखल घेतली नसल्याने आज भोरे यांनी नगरपालिका परिसरातच अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. यामध्ये ते गंभीररित्या भाजले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी धाडसाने पुढे येऊन आग विझवली व त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान भोरे यांचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी नगरपरिषदेच्या दारातच मृत नरेश भोरे यांचा मृतदेह ठेवत जोपर्यंत संबंधितांवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका घेतली.
मात्र पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला. दरम्यान, आज पहाटे 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.