कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथे देवीच्या पालखी मिरवणूकी समोर फटाके उडवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. तर दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांनी नंग्या तलवारी आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा स्थानिकांमधून होत आहे. एकमेकांच्या अंगावर जात शिवीगाळ करून दगडफेक झाल्याने गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपासून या दोन गटांमध्ये वाद असल्याने हा प्रकार घडला असून या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी हस्तक्षेप करत 23 जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत.
फटाके वाजवण्याच्या कारणावरून राडा -मजरेवाडी येथील होळकर चौकात साहेब ग्रुप व सरकार प्रेमी असे दोन ग्रुप आहेत. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यापासून या दोन्ही गटांमध्ये वाद चालू होता. दरम्यान काल गावात लक्ष्मी-देवीची यात्रा सुरू असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सरकार साहेब चौकात आल्यानंतर एका गटाने फटाके उडवत असताना दुसऱ्या गटाने फटाके उडवण्यास मज्जाव केला. दरम्यान दोन्ही गटांमध्ये वाद चिघळला आणि वादाचे शिवीगाळ व हाणामारीमध्ये रूपांतर झाले. या सर्व प्रकाराची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, अमित पाटील यांनी धाव घेत जमावास पांगवले. हा सर्व प्रकार पोलिसांसमोरच घडला असून पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यामुळे काल दिवसभर गावातील प्रमुख मंडळींनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. तसेच दोन्ही गटातील वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू होता. या दोन्ही गटाच्या राड्यामध्ये दोघेजण जखमी झाले असून दोघांवर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.