कोल्हापूर -येथील ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी ( Save Jaiprabha Studio ) अखिल भारतीय मराठी चित्रपट महासंघाने गेल्या 38 दिवसांपासून जयप्रभा स्टुडिओच्या दारात बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. मात्र, या आंदोलनाची दखल अद्याप शासनाने घेतली नसल्याने सरकारचा निषेध करत कलाकार आंदोलकांनी काळी रंगपंचमी साजरी केली.
आंदोलकांनी एकमेकांना काळा रंग लावून ही रंगपंचमी साजरी करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. कोल्हापूरची श्वेता आणि भालजी पेंढारकर यांची आठवण असलेली जयप्रभा स्टुडिओ ची जागा तब्बल सहा कोटी 50 लाख रुपयांना विक्री झाल्याचे समोर आले आहे. सदर ची जागा श्री महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी फर्मने खरेदी केली असून यामध्ये जिल्ह्यातील शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांच्या दोन पुत्रांचा देखील सहभाग आहे.यामुळे हा स्टुडिओ कलाकारांसाठी पुन्हा सुरू करावा यासाठी गेल्या 38 दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने जयप्रभा स्टुडिओ च्या दरात साखळी उपोषण सुरू आहे.
काळी होळी खेळायची वेळ येईल -
दरम्यान गेल्या 38 दिवसापासून चालू असलेल्या उपोषणाची दाखल सरकारने न घेतल्याने कलाकारांनकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. एकमेकांना काळा रंग लावून रंगपंचमी साजरी केली आहे. एकाबाजूला राज्यात निरनिराळया रंगाची उधळण करत रंग खेळले जात असताना दुसऱ्या बाजूला कलाकारांवर काळी होळी साजरी करण्याची दुर्देवी वेळ आल्याचे कलाकारांनी म्हंटले आहे. तसेच आज आम्ही काळी होळी खेळत आहोत भविष्यात समोरच्यांना काळी होळी खेळायची वेळ येईल असा इशारा कलाकारांनी दिला आहे.