महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक - रेमडेसिवीरचा काळाबाजार

कोल्हापुरातील बागल चौक परिसरातील जयराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संशयित आरोपी सचिन दौलत जोगम आणि प्रणव राजेंद्र खैरे हे निदर्शनास आले. सचिन जोगम याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडे एक रेमडेसिवीर इंजेक्शनची बाटली मिळून आली. तर प्रणव खैरे याच्याकडे दोन रेमडेसिवीरच्या बाटल्या अशा एकूण तीन बाटल्या मिळून आल्या.

रेमडेसिवीरचा काळाबाजार
रेमडेसिवीरचा काळाबाजार

By

Published : May 9, 2021, 10:29 PM IST

कोल्हापूर -संपूर्ण राज्यभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. यामध्ये अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन फायदेशीर ठरत आहे. त्याचाच फायदा घेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी कोल्हापुरात सक्रिय झाली असून त्यातील तिघांना 3 इंजेक्शनसह पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव राजेंद्र खैरे (रा. इस्लामपूर), सचिन दौलत जोगम (रा. सानेगुरुजी वसाहत) आणि प्रकाश लक्ष्मण गोते अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली असून यामध्ये आणखी कोण सहभागी होते, तसेच याचा सूत्रधार कोण आहे याचाही पोलीस शोध घेत आहेत.



एका इंजेक्शनची 23 हजारांनी करत होते विक्री

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन 23 हजार रुपये दराने विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह अन्न व औषध प्रशासन विभागाकडील दोन औषध निरीक्षक अधिकारी यांच्या पथकाने सापळा लावला. कोल्हापुरातील बागल चौक परिसरातील जयराज पेट्रोल पंपाच्या शेजारी संशयित आरोपी सचिन दौलत जोगम आणि प्रणव राजेंद्र खैरे हे निदर्शनास आले. सचिन जोगम याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडे एक रेमडेसिवीर इंजेक्शनची बाटली मिळून आली. तर प्रणव खैरे याच्याकडे दोन रेमडेसिवीरच्या बाटल्या अशा एकूण तीन बाटल्या मिळून आल्या. औषध कोणाकडून मिळाले याबाबत चौकशी केली असता सचिन जोगम हा मेडिकलमध्ये नोकरी करत असून तो ज्या लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्यांच्याकरता त्याचा मित्र प्रकाश लक्ष्मण गोते आणि प्रणव राजेंद्र खैरे यांच्याकडून औषध विकत घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रकाश गोते याचा शोध घेऊन त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली.


प्रणव राजेंद्र खैरे वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात घेतोय शिक्षण

याच्यातील संशयित आरोपी प्रणव राजेंद्र खैरे हा वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. सध्या तो मंगळवार पेठ कोल्हापूर येथील शरण्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता. या हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारामधील शिल्लक राहिलेल्या रेमडेसिवीर औषध जादा दराने सचिन दौलत जोगमला विकत होता. तसेच प्रकाश लक्ष्मण गोते हा सुद्धा उद्यम नगर येथील वालावलकर हॉस्पिटल येथे नोकरीस आहे. तो सुद्धा या हॉस्पिटलमधून रेमडेसिवीर औषध उपलब्ध करून ते सचिन दौलत जोगमला विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा-नाशिकमध्ये टोसिलिझुमब इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details