कोल्हापूर -कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. मास्क, सॅनिटायझर तसेच अन्य आवश्यक साहित्य चढ्या दराने खरेदी करून यंत्रणेतील लोकांनी मोठा डल्ला मारल्याचे भाजप सदस्यांचे म्हणणे आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने मात्र विरोधकांच्या या सर्व आरोपांचे खंडन केले. साहित्य खरेदीवरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापले आहे.
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. जिल्ह्यातील रुग्णसंख्येन आता 16 हजारांचा टप्पा ओलांडला असून कोरोना बळींची संख्या देखील 500 पर्यंत जाऊन पोहचली आहे. एका बाजूला जिल्ह्यात अशी गंभीर स्थिती असताना जिल्हा परिषदेने कोरोना काळात केलेली साहित्य खरेदी चर्चेचा विषय बनली आहे. साहित्य खरेदीत 30 ते 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी भाजपच्या सदस्यांनी केला आहे. साहित्य खरेदी करणाऱ्या यंत्रणेतील लोकांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरून हा ढपला पाडल्याचे भाजप सदस्यांचे म्हणणे आहे. विरोधकांचा हा आरोप काल झालेल्या सर्वसाधारण सभेवेळी कळीचा मुद्दा बनला. विरोधकांना सभागृहात यायला मज्जाव केल्याने भाजप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाबाहेरच ठिया मारत निषेध व्यक्त केला. कोरोना काळात मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, पल्स ऑक्सीमिटर, व्हेंटिलेटर असे सगळे साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचा आरोप करत याची 'कॅग'मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजपचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केली आहे.