कोल्हापूर - 2024 मध्ये कोणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा, भाजप 400 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
मोदी दर तीन महिन्यांनी फिडबॅक घेत आहेत -
चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप 400 हून अधिक जागा जिंकणार असा वारंवार रिपोर्ट येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांनी फिडबॅक घेत आहेत आणि फिडबॅक घेण्याची आवश्यकताच नाही. नागरिक आनंदी आहेत. लोकांना माहिती आहे की, माझ्या घरात गॅस कनेक्शन यांनी आणलं आहे. लोकांना माहिती आहे की विरोधक पेट्रोल-डिझेल संदर्भात जे आंदोलन करत आहेत ते स्वत:च्या सरकारलाही विचारत नाहीत. 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडी सरकारला घरी पाठवणार.
चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना एकमेकांशी भांडतील पण सत्ता सोडतील असे वाटत नाही - यावेळी नाना पटोले आणि शरद पवार यांच्याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, एकाने मारायचे आणि दुसऱ्यांना समजवायचे असा खेळ सध्या राज्यात सुरू आहे. हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही. याची शिक्षा त्यांना येणाऱ्या निवडणुकीत मिळेल. सरकारचे नाटक चालू आहे. त्याला लोकही विकली आहेत, अशी घणाघाती टीका सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शिवाय राज्यातील सरकार कोसळायला पटोले कारणीभूत ठरतील का? आणि कर्नाटकची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल का, याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले सत्तेची ताकद काय असते हे या सर्वांनाच चांगले माहीत आहे. हे सर्वजण एकमेकांसोबत भांडतील मात्र सरकार पाडतील असे वाटत नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
पंकजा मुंडे यांनी अतिशय परिपक्व असल्याचे दाखवून दिले -
केंद्रात प्रीतम मुंडे यांना संधी दिली नसल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी काल मुंबईमध्ये आपली भूमिका मांडली. यामध्ये त्यांनी आपण अतिशय परिपक्व असल्याचे दाखवून दिले आहे. ज्या गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला महाराष्ट्रात संघर्ष करणारी संघटना बनवली त्या मुंडे यांच्या घरात जन्माला आलेल्या पंकजा मुंडे कधीही बंडाची भूमिका घेणार नाहीत. एखाद्यावेळी काही गोष्टी पटल्या नाहीत तर त्यांनी आपल्या भावना मांडण्यास काहीही हरकत नाही. पण एकाला न्याय देत असताना कुणावर तरी अन्याय होतो. आपली नाराजी मांडून पुढे त्यांनी ज्या पद्धतीने सावरून आपल्याच घरातून आपण का बाहेर जावे, असे कार्यकर्त्यांना समजावले. यातून त्यांची कमी वयात असलेली परिपक्वता दिसून आली, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान, भोसरी जमीन व्यवहार प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर काही बोलणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.