कोल्हापूर - महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्री यांना काही म्हणायचे नसते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनाही काही म्हणायचे नसते. मात्र मुश्रीफांना लगेचच काहीतरी म्हणायचे असते, त्यांची ही सर्व केविलवाणी धडपड केवळ निष्ठा दाखवण्यासाठी असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे मुश्रीफांना लगावला आहे.
2014 ते 2019 बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर काय झोपा काढत होतात? इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा, मात्र त्याआधी 2020 बदल्यांमधील चौकशी करा. तुम्ही काही केले नाही तर तुम्हाला झोंबंते कशाला, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले आहे.
पाटील पुढे म्हणाले, यांना ग्रामपंचायतींना प्रशासक, पी एम केअर, सुशांत प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायच्या असतील तर कोण काय करणार? मी जे म्हणतो तेच महाराष्ट्राच्या डी. जी. नी म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटले.
दरम्यान, सध्या कोल्हापुरात प्रशासन हतबल आहे. कोरोना साहित्य खरेदीत भ्रष्टाचार, रुग्णांना बेड मिळत नाही आहेत, स्वॅबच्या रिपोर्टमध्ये गोंधळ असा हाहाकार माजल्याच्या बातम्या रोज प्रसार माध्यमातून येत असताना त्याबाबत हसन मुश्रीफ काहीही बोलत नाहीत, पण वर घडणाऱ्या गोष्टींवरुन जनतेचे लक्ष विचलीत व्हावे म्हणून अन्य गोष्टींवर बोलत असल्याचा टोला सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना लगावला आहे.